भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरातील हजारो कलाप्रेमी नागरिक ज्या फेस्टिव्हलची वाट पाहत आहेत त्या 'विहंग संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'चे यंदा ४ दिवस आयोजन करण्यात आले आहे. १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान हा भव्य दिव्य कला महोत्सव होणार असून दिग्ग्ज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. चार दिवसांत किमान २ लाख लोक या महोत्सवाला भेट देणार असून त्याची तयारी जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये प्रवेश मोफत मिळणार आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ वर्षांपूर्वी 'संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'ला सुरुवात केली. यंदा प्रताप सरनाईक फाऊंडेशनतर्फे 'संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल' होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे हे फेस्टिव्हल होणार आहे.
हे आर्ट फेस्टिव्हल म्हणजे मीरा-भाईंदर शहराचे कला-संस्कृती वैभव आहे. 'विकासकामे करण्याबरोबरच शहरातील नागरिकांना कला,संस्कृती, साहित्य विषयक मेजवानी देणे, तसे वातावरण तयार करणे हे पण माझे लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे.
५० ते ६० हजार नागरिक भेट देतील
यंदा मोठ्या जल्लोषात हे मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल होणार असून दररोज किमान ५० ते ६० हजार मीरा-भाईंदरकर नागरिक या फेस्टिव्हलला भेट देतील अशी अपेक्षा आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरारोड, मंगल नगर येथील जनसंपर्क कार्यालयातून फेस्टिव्हल प्रवेशासाठी मोफत पास वाटले जाणार आहेत. ज्यांना या फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी जनसंपर्क कार्यालयातून पास घेऊन जावे. पास पूर्णपणे मोफत आहेत. कला व आपल्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या सर्व मीरा-भाईंदरकर नागरिकांनी चारही दिवस या आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.