आशिष दामलेंना मंत्रिपदाचा दर्जा

राज्याच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला नवा मंत्री मिळाला आहे.
(Photo - FB/Captain Ashish Damle)
(Photo - FB/Captain Ashish Damle)
Published on

बदलापूर : राज्याच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या रूपाने ठाणे जिल्ह्याला नवा मंत्री मिळाला आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागाने १६ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा आणि संबंधित सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महामंडळाचे अध्यक्ष हे पदसिद्ध राज्यमंत्री असतात, मात्र दामले यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर विविध महामंडळांचे वाटप करण्यात आले. ब्राह्मण समाजासाठी महत्त्वपूर्ण असलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेले. बदलापूरचे आशिष दामले हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांची निवड गुपचूपपणे झाल्याने महायुतीतील इतर पक्ष आश्चर्यचकित झाले होते. नियुक्तीनंतर दामले राज्यभर फिरून महामंडळाचे काम पाहत होते.

अलीकडेच मंडळासाठी नवे अधिकारी नेमण्यात आले होते आणि कारभार वेगाने सुरू होता. दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले असून, या नियुक्तीमुळे महामंडळाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षभरात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर ८० पेक्षा अधिक दौरे करून विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. प्रतिकूल परिस्थितीत जातीय सलोखा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न हे माझे प्रमुख कर्तव्य आहे. मी ब्राह्मण असलो तरी माझी आई गुजराती आणि पत्नी मराठा आहे. नगरसेवक पदासाठी मागासवर्गीय आणि बौद्ध समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी यशस्वी झालो. हा पाठिंबा पुढेही कायम राहावा यासाठी मी काम करणार आहे. - आशिष दामले.

logo
marathi.freepressjournal.in