
पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी (रा. वेवजी, तलासरी) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अशोक धोडी हत्याकांडात आतापर्यंत ६ जणांना अटक झाली असून तीन जण फरार आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.
१९ जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या करून त्यांच्याच कारच्या डिकीत गोणीत मृतदेह बांधून मोठ्या शितफीने गुजरात राज्यातील अच्छाडजवळील एका पाण्याने भरलेल्या खदाणीत कार बुडवली होती. तब्बल १२ दिवसांनांतर पोलिसांना या कारमध्ये सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. या प्रकरणातील पाच आरोपींना त्याचवेळी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी आणि मयत अशोक रमण धोडी यांचा लहान भाऊ अविनाश रमण धोडी हा मागील पाच महिन्यांपासून गुंगारा देत होता. अखेर रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सेलवासमधील मुर्खंद येथून अटक करण्यात आली आहे.
जमिनीच्या तसेच दारूच्या व्यवसाय आदी वादातून अविनाश धोडी याने आपला मोठा भाऊ आणि शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केली होती.