ठाणे : मागील कित्येक दिवस ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची वर्णी लागणार असल्याची ठाण्यात चर्चा होती; मात्र जयजीत सिंह यांच्या बदलीचे आदेश काही येतच नव्हते. सोमवारी अखेर ठाण्याचे पोलीस आयुक्त जायजित सिंह यांच्या बदलीचे आदेश आले असून, त्यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे, तर अपेक्षेप्रमाणे गुप्तवार्ता आयुक्तपदी असलेले आशुतोष डुंबरे यांची ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाबाबत खडान् खडा माहिती असलेले डुंबरे यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.