वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव

सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या डोंगररांगामध्ये वन्यप्राणांचा वावर जास्त आहे; मात्र, या परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे; वन्यप्राण्यांची मानवी 
वस्तीकडे धाव

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे शहरालगत असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन्यप्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे, तर हरिश्चंद्र गड, नाणेघाट, तानसा अभयारण्यातही पक्षी, वन्यप्राण्यांचा मोठा विहार पाहायला मिळतो; मात्र सध्या अति उष्णतेमुळे वन क्षेत्रातील पाणवठेही कोरडेठाक पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी गाव-पाडे व शहरी भागाकडे धाव घेऊ लागले आहेत.

सह्याद्री रांगांमध्ये वसलेल्या डोंगररांगामध्ये वन्यप्राणांचा वावर जास्त आहे; मात्र, या परिसरात डोंगरांना वणवा लागण्याच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या वसई, विरार, शहापूर, मुरबाड, भिवंडी भागात जंगलातील बिबटे, तरस, माकडेही अन्न-पाण्यासाठी शहराकडे धाव घेताना दिसतात.

एप्रिल महिन्यात अतिउष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना वन्यप्राणीही त्यापासून सुटू शकले नाहीत. वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. त्यात मुक्या आणि दुर्मिळ होत असलेल्या अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, मावळ तालुक्यातील अनेक वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने प्राणी शहराकडेही धाव घेताना दिसत आहेत.

ठाणे जिल्ह्यात मोठी वनराई जंगले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात वनविभागाचे क्षेत्र आहे; मात्र, येथे पाणवठे दिसत नाहीत. तसेच असलेल्या पाणवठ्यात पाणी उपलब्ध नाही. परिणामी तहान भागविण्यासाठी प्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. मोर, हरणे पाण्याच्या शोधात येत आहेत. गावामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.

डोंगरांना वणवा लावण्याचे प्रमाण मोठे

अतिदुर्गम भागात शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील डोंगररांगा आहेत. त्यात उन्हाची चाहूल लागताच डोंगरांना वणवा लावण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच वणव्यांमुळे व पाण्याच्या दुर्भिक्षामुळे या डोंगरांगांमधील प्राणी नागरी वस्तीकडे येताना दिसत आहेत. त्यातच गेल्या १५ दिवसांपासून मावळ तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. परंतु वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

पाणवठे भरणे गरजेचे

त्यामुळे वन विभाग व स्थानिक प्रशासनाने वनक्षेत्रातील पाण्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्याचा फटका वन्यजीवांनाही बसला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणवठे कोरडे पडू लागले. त्यामुळे पशू-पक्षी तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीत येत आहेत. यावर उपाय म्हणून पाणवठे भरणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in