जानेवारी महिन्यातच पाण्यासाठी वणवण!

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागात नववर्षाच्या आरंभीच पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने येथील भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जानेवारी महिन्यातच पाण्यासाठी वणवण!

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथे बहुसंख्य आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील डोळखांब विभागात नववर्षाच्या आरंभीच पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने येथील भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

डोंगर पठाराच्या उतारावर असलेल्या रानविहीर ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास १६०० च्या आसपास असून, येथील महिला भगिनींना जानेवारीतच पाण्यासाठी दोन-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. तसेच येथे असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पाणी योजना, इंधन विहिरी, पाणी स्रोत कोरडे ठाक पडल्याने येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा पोहचत आहेत. जिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यामध्ये दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करून देखील शहापूरकरांची तहान काही भागत नाही.

शहापूरला पडलेली कोरड कधी संपणार?

तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा यासारखी महाकाय धरणे असतानाही शहापूर तालुक्याच्या घशाला पडलेली कोरड कधी संपणार, हा देखील मोठा यक्ष प्रश्न आहे. याबाबत रानविहीर ग्रामपंचायतीचे सदस्य ललिता प्रदिप दुटे, मनिषा केशव डोहळे, एकनाथ बुधा भगत, सुमन तुकाराम लाखे यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे आपली कैफियत मांडली आहे.

logo
marathi.freepressjournal.in