बदलापूरातून ४५ हजार गणेशमूर्ती रवाना होणार परदेशात

बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाडचा वेगळा ठसा
representative photo
representative photo

गणेश मूर्ती निर्यात व्यवसायात अल्पावधीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून यंदा ४५ हजारहून अधिक गणेशमूर्ती परदेशात रवाना होणार आहेत. पहिली खेप कॅनडाला रवाना झाली असून लवकरच इतर देशांतही मुर्त्या रवाना केल्या जाणार आहेत.

बदलापुरातील युवा उद्योजक निमेश जनवाड गेल्या सहा वर्षांपासून चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून परदेशात गणेशमूर्ती निर्यात व्यवसाय करीत आहेत. निमेश दुबई, कॅनडासह अमेरिका, इंग्लंड, युरोप, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अशा अनेक देशात गणेशमूर्ती निर्यात करतात. नुकतेच त्यांनी कॅनडाला अडीच हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या आहेत. तस पाहिले तर गणेशोत्सव सहा महिन्यांनी आहे. परंतु परदेशातील प्रवास लांबचा असल्याने जलमार्गाने पाठवल्या जाणाऱ्या गणेशमुर्ती वेळेवर पोहचाव्यात. तसेच तेथील भाविकांना बाप्पाची मनोभावे सेवा करून गणेशोत्सव साजरा करता यावा,यासाठी सहा महिने अगोदरच मुर्त्या निर्यात केल्या जातात. त्यानुसार पहिल्या खेपेत कॅनडाच्या व्हॅनकुव्हर शहरात अडीच हजार बाप्पा रवाना झाले आहेत.

तर २०२० साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्याने त्याला तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता. त्यानंतर २०२१ साली त्याने मोठी झेप घेत २० हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या, तर २०२२ साली त्याने ३५ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवत नवीन विक्रम केला होता. यंदाच्या वर्षी त्याच्याही पुढे जात तब्बल ४५ ते ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवण्याची निमेशची तयारी आहे. त्याने पाठवलेल्या गणेशमूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. जुलै महिन्याअखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते, ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. मसाला किंग धनंजय दातार यांनी सन २०१७ मध्ये गणेशमूर्तींची परदेशातील पहिली ऑर्डर देऊन निमेशच्या चिंतामणी क्रिएशन्सला निर्यात व्यवसायात संधी दिली. २०१७ मध्ये मिळालेल्या या संधीचे सोने करीत निमेशने २०१८ मध्ये ३ हजार आणि २०१९ साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in