बदलापूर आरोपीचे एन्काऊंटर; स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा, चकमक बनावट असल्याचा विरोधकांचा संशय
ठाणे : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी सोमवारी चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय ठार झाला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहेत. या घटनेने खळबळ माजली असून घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. न्यायालयाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले. साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले असता अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले. त्यानंतर सोबत असलेल्या पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ३ गोळ्या झाडल्या, त्यात अक्षय जखमी झाला. त्याच्या डोक्याला एक गोळी तर शरीरावर दुसरी गोळी लागली. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेला तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेले, तर जखमी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षयने केलेल्या गोळीबारात त्यांच्या पायाला एक गोळी लागली आहे. पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या अक्षयला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बदलापूरवासीयांनी रेल्वे मार्गावर उतरून आंदोलन केले होते आणि त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अक्षयला अटक करण्यात आली आणि नागरिकांच्या संतापाची दखल घेत राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. एसआयटीने तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते.
त्यानंतर अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अक्षयविरोधात अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने त्याला ताब्यात घेतले होते. पोलीस सोमवारी त्याला तळोजा कार्यालयातून घेऊन जात असताना त्याने मुंब्रा बाह्यवळणाजवळ पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. तेव्हा स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय ठार झाला. मात्र, पोलिसांनी जाहीर केलेला हा संपूर्ण घटनाक्रम संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे. दरम्यान, अक्षय याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश - फडणवीस
या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांनी ही घटना घडल्यानंतर विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्याचे आदेशही दिले होते.
अन्य आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचे कृत्य - पृथ्वीराज चव्हाण
हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले, असा सवालही त्यांनी विचारला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला, असा सवाल त्यांनी विचारला.
न्यायालयीन चौकशी होणार - ॲड. निकम
बदलापूर अत्याचार प्रकरणातील सरकारचे वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले की, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल. त्यासंदर्भात आज काहीही बोलणे योग्य होणार नाही. माझं कुठल्याही अधिकाऱ्यासोबत बोलणे झाले नाही, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंतच्या तपासात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला मिळाले होते. आरोपीला आरोपपत्राची प्रत मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असे निकम यांनी म्हटले आहे.
पोलिसांची बंदूक लॉक असते- ॲड. असीम सरोदे
बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला तुरुंगातून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली? पोलिसांवर दबाव होता. त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही उच्च न्यायालयात उद्याच हा सर्व प्रकार मांडणार आहोत. शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, अशी प्रतिक्रिया अॅड. असीम सरोदे यांनी दिली.
चकमकीचे फेक नरेटिव्ह सेट - अनिल देशमुख
आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळाचालक भाजप पदाधिकारी आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नरेटिव्ह सेट केले, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकावू शकतो, असा सवाल त्यांनी केला.
प्रकरण दडपण्यासाठी खोटी चकमक- सुषमा अंधारे
अक्षय शिंदेचा आवाज जागच्या जागी बंद केला का? अशी विचारणा करत प्रकरण दडपण्यासाठी हत्या केली की एन्काऊंटर अशी विचारणा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. या प्रकाराची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली. दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? अशी विचारणा त्यांनी केली. या प्रकरणातील संस्थाचालक आपटे अजूनही फरार का आहे? हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी हा प्रकार झाला आहे का? या प्रकरणातील पोलीस निलंबित झाले पाहिजेत. संबंधितांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे. पहिल्यापासून या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे, असे ते म्हणाले.
बदलापूर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव
बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली असून, त्यावर न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या एकल खंडपीठाने १ ऑक्टोबरला सुनावणी निश्चित केली आहे.
तो बंदूक हिसकावू शकत नाही - आरोपीची आई
आपला मुलगा रस्ता ओलांडतानाही माझा हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊच शकत नाही, अशी प्रतिक्रिया आरोपी अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे. त्याच्या आईने सांगितले की, माझा मुलगा असे करूच शकत नाही. रस्ता ओलांडतानाही तो माझा हात पकडायचा. तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो?
पोलिसांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणे चुकीचे - मुख्यमंत्री
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या चकमकीप्रकरणी विरोधकांनी संशय घेऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली आहे. ही टीका चुकीचे असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद - शरद पवार
बदलापूर दुर्घटनेतील अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झाली पाहिजे होती. परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. या निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही. यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलेय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
फरार आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
फरार आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलीस अधिकारी इतके बेसावध आणि निष्काळजीपणे आरोपींना घेऊन जातात का?, एक महिना उलटला तरीही बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक का झालेली नाही? आदी सवाल पटोले यांनी उपस्थित केले.