बदलापूर-अक्कलकोट बससेवेला हिरवा कंदील; १० ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस बससेवा

बदलापूर शहरातून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदलापूर ते अक्कलकोट या बससेवेला अखेर परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. येत्या १० ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस ही बससेवा सुरू होणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बदलापूर : बदलापूर शहरातून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बदलापूर ते अक्कलकोट या बससेवेला अखेर परिवहन विभागाने मान्यता दिली आहे. येत्या १० ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्त्वावर आठवड्यातून एक दिवस ही बससेवा सुरू होणार असून, यामुळे स्वामी भक्तांना आता थेट बदलापुरातून अक्कलकोटला पोहोचणे शक्य होणार आहे.

बदलापूरमध्ये अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे आणि शेगावच्या गजानन महाराजांचे मोठ्या संख्येने भक्त आहेत. या भक्तांना आजवर अक्कलकोट किंवा शेगावला जाण्यासाठी कल्याण, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांत जावे लागत होते किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे त्यांची प्रवासात मोठी गैरसोय होत होती. या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बदलापूर-अक्कलकोट आणि बदलापूर-शेगाव बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आमदार आव्हाड यांनी तातडीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून ही मागणी केली. परिवहन मंत्र्यांनी या मागणीची दखल घेऊन कार्यवाहीच्या सूचना दिल्यानंतर, परिवहन विभागाने १० ऑक्टोबरपासून बदलापूर ते अक्कलकोट बससेवा सुरू करण्याचे आणि दिवाळीपर्यंत बदलापूर ते शेगाव बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. याबाबतच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्याचे ठाणे विभाग नियंत्रकांनी पत्राद्वारे कळवले आहे.

असे असेल दरपत्रक

बदलापूर ते अक्कलकोट व्हाया कल्याण या बससेवाठी तिकीट ८०५ रुपयांचे असणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसप्रमाणे या बसमध्येही महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात म्हणजे ४०३ रुपयांत प्रवास करता येणार आहे, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

बुकिंग सुविधा

बदलापूर ते अक्कलकोटसाठी सुरू करण्यात येणाऱ्या बसची आसन क्षमता ४० असणार आहे. या बसप्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या वेबसाइटवर तसेच रेड बस ॲपवर ऑनलाइन सीट बूक करता येणार आहे. त्याशिवाय बदलापूर एसटी बसस्थानकातही ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. या बससेवेमुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील हजारो स्वामी भक्तांची तीर्थस्थळी पोहोचण्याची इच्छा आता सुलभ होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in