सेफ्टी बेल्ट तुटला, सातव्या थरावरून बालगोविंदा कोसळला; बदलापुरातील घटनेने काळजाचा ठोकाच चुकला, तरुणांनी अलगद झेलल्याने गोविंदा बचावला

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘माखनचोर दहीकाला उत्सवा’त सेफ्टी बेल्ट तुटल्याने सातव्या थरावरून बाल गोविंदा कोसळल्याची घटना घडली आहे.
सेफ्टी बेल्ट तुटला, सातव्या थरावरून बालगोविंदा कोसळला; बदलापुरातील घटनेने काळजाचा ठोकाच चुकला, तरुणांनी अलगद झेलल्याने गोविंदा बचावला
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘माखनचोर दहीकाला उत्सवा’त सेफ्टी बेल्ट तुटल्याने सातव्या थरावरून बाल गोविंदा कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने खाली उभ्या असलेल्या सतर्क तरुणांनी त्या बाल गोविंदाला अलगद झेलल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. परंतु या घटनेने गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

युवा सेना शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या माध्यमातून बदलापूर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात बदलापूरसह उपनगर आणि मुंबई परिसरातील विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रज्वल प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकाने सात थरांचा मनोरा उभारून सलामी देण्यास सुरुवात केली. सातव्या थरावर असलेल्या बाल गोविंदाला सेफ्टी बेल्ट लावण्यात आला होता. मात्र सलामी देत असताना अचानक सेफ्टी बेल्ट तुटल्याने तो चिमुकला गोविंदा सातव्या थरावरून खाली कोसळला. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र खाली असलेल्या काही सतर्क तरुणांनी प्रसंगावधान राखत बालगोविंदाला अलगद झेलले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत बालगोविंदाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसून तो सुखरूप असल्याची माहिती मिळाली.

आयोजकांनी योजावेत सुरक्षा उपाय

सातव्या थरावरून बालगोविंदा खाली कोसळण्याची घटना पुढे आल्याने दहीहंडी आयोजकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in