बदलापूर : मंगळवारपासून पाव महागणार; २० रुपयांची लादी आता २३ रुपयांना

सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेलला पाव महागणार आहे. बदलापुरात पावाचे दर प्रति लादी ३ रुपयांनी महागणार आहे. मंगळवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
बदलापूर : मंगळवारपासून पाव महागणार; २० रुपयांची लादी आता २३ रुपयांना
Published on

बदलापूर : सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेलला पाव महागणार आहे. बदलापुरात पावाचे दर प्रति लादी ३ रुपयांनी महागणार आहे. मंगळवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत २० रुपयांना मिळणारी पावाची लादी बदलापूरकरांना मंगळवारपासून २३ रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.

बदलापुरातील बेकरी मालकांच्या कुळगांव-बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोसिएशनच्या नुकतेच पार पडलेल्या बैठकीत पावाची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत सर्वानुमते दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे सचिव उजेर मुल्ला यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे पाव तसेच खारी, बटर, टोस्ट व इतर बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी लागणाऱ्या तेल, तूप, साखर, मैदा अशा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर भट्टीसाठी लागणाऱ्या लाकडांच्या किमतीतही वाढ झाली असल्याने कुळगांव-बदलापूर बेकरी ओनर्स असोसिएशनने नाइलाजास्तव भाववाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पावाच्या किमतीत ३ रुपयांनी तर खारी, बटर व टोस्टच्या किमतीत पाव किलोमागे १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बदलापुरात एकूण २० बेकऱ्या असून यामध्ये दिवसाला ६ हजाराहून अधिक लादी पाव तयार केले जातात. ३ वर्षांपूर्वी नोव्हेंबर- २०२१ मध्येही पावाचे दर प्रति लादी २ रुपयांनी वाढवण्यात आले होते.

वडापावही महागणार?

पावाच्या दरात प्रति लादी ३ रुपयांनी वाढ होणार असल्याने त्याचा परिणाम वडापाव, मिसळ पाव, दाबेली आदी खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in