
विजय पंचमुख/बदलापूर
काही दिवसांपूर्वीच बदलापुरात पावाची लादी तीन रुपयांनी महागल्यानंतर आता पोळीभाजी केंद्रावर मिळणाऱ्या पोळीभाजीचे दरही वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पोळीभाजी केंद्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्यांना या दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात डाळी, साखर, तेल, तूप, गॅस यासह सर्वच पदार्थांचे दर वाढले असून भाजीपाल्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. लसूण, कांद्यासह इतर मसालेही महागले आहेत. त्यामुळे पोळी भाजी व्यावसायीकांनी सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पोळी तृप्ती भाजी केंद्राचे संचालक काशिनाथ मगर यांनी दिली.
बदलापुरात पोळीभाजी केंद्रावर यापूर्वी एक पोळी ७ रुपयांना मिळत होती. तर भाकरी १४ रुपयांना मिळत होती. शंभर ग्रॅम भाजीसाठी २५ रुपये मोजावे लागत होते. तर वरण, आमटी आणि कढी हे १५ रुपये शंभर ग्रॅम दराने मिळत होते. परंतु आता दरवाढीनंतर एक पोळी ८ रुपयांना एक तर भाकरी १६ रुपयांना मिळणार आहे. तर भाजी ३० रुपये १०० ग्रॅम मिळणार आहे. तर वरण, आमटी आणि कढी २० रुपये १०० ग्रॅम दराने मिळणार आहे.
चाकरमान्यांनाही फटका
बदलापुरातील बहुतांश लोक चाकरमानी वर्गातील असून अनेक कुटुंबात पती पत्नी दोघेही नोकरी करणारे आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांना हॉटेलच्या तुलनेत स्वस्त पडणारी पोळीभाजी अधिक सोयीस्कर ठरते. बदलापुरात अशी कुटुंबे मोठ्या संख्येने असल्याने बदलापुरात पोळीभाजी केंद्रांना चांगला प्रतिसाद आहे. बदलापूर शहरात ७० हून अधिक पोळी भाजी केंद्र असून रेल्वे स्टेशन जवळच्या परिसरात सर्वाधिक पोळीभाजी केंद्रे आहेत.