बदलापूर : थकीत मालमत्ता कर न भरल्यास जप्तीची कारवाई; नगर परिषदेची करवसुली मोहीम सुरू

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने मालमत्ता करवसुली करण्यासाठी आता धडक मोहीम हाती घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांना थकीत करभरणा करण्याबाबत नोटिसा बजावूनही करभरणा झालेला नाही.
बदलापूर : थकीत मालमत्ता कर न भरल्यास जप्तीची कारवाई; नगर परिषदेची करवसुली मोहीम सुरू
बदलापूर : थकीत मालमत्ता कर न भरल्यास जप्तीची कारवाई; नगर परिषदेची करवसुली मोहीम सुरूसंग्रहित छायाचित्र
Published on

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने मालमत्ता करवसुली करण्यासाठी आता धडक मोहीम हाती घेतली आहे. ज्या मालमत्ताधारकांना थकीत करभरणा करण्याबाबत नोटिसा बजावूनही करभरणा झालेला नाही. अशा मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासही नगर परिषदेने सुरुवात केली आहे.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा १०० टक्के करवसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने आता प्रभावीपणे करवसूली करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषदेने २७ फेब्रुवारीपासून विशेष दोन करवसुली मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत पहिल्याच दिवशी नगर परिषदेच्या पथकाने २३ लाख ७५ हजार ८६९ रुपयांची करवसुली केली आहे. तर या पथकाने दिलेल्या भेटीनंतर संबंधित मालमत्ताधारकांनी ४ लाख ९८ हजार ८२६ रुपयांचा करभरणा केला आहे.

नागरी सुविधा केंद्रात येऊन मालमत्ताधारकांनी ४७ लाख ६८ हजार ७५४ रुपयांचा करभरणा झालेला आहे. म्हणजेच एकच दिवसात नगर परिषदेच्या तिजोरीत ७३ लाख ४४ हजार ६२३ रुपये इतका महसूल जमा झाला आहे. नगर परिषदेने या मोहिमेसाठी शहराच्या पूर्व व पश्चिम भागासाठी दोन वेगवेगळी पथके तयार केली असून पहिल्या टप्प्यात व्यावसायिक गाळे धारकांकडून थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे. त्यांना थकीत मालमत्ता कराचे मागणी बिल तसेच जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने नगर परिषदेचे पथक त्यांच्याकडे जाऊन करवसुली व कारवाई केली असल्याची माहिती नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी दिली.

७ गाळ्यांवर जप्तीची कारवाई

विशेष मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नगर परिषदेच्या वसुली पथकाने ६ दुकानांचे गाळे जप्त केले आहेत. त्यामध्ये कुळगावमधील ४, शिरगावमधील २ व मांजरलीमधील १ गाळ्याचा समावेश आहे. ५ लाख ८७ हजार १६८ रुपयांच्या थकीत मालमत्ता करासाठी हे गाळे जप्त करण्यात आले असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in