

विजय पंचमुख/बदलापूर
ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिकदृष्ट्या नावारूपाला आलेल्या बदलापूर शहराचे नाट्यगृहाचे स्वप्न अद्याप अधुरेच आहे. प्रशासनाच्या संथगती कारभारामुळे भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने नाट्यगृहासाठी मिळालेला निधी शासनाकडे परत गेला असून, बदलापूरकरांचे हे स्वप्न आता आणखी काही वर्षांसाठी लांबणीवर गेले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेने नुकतेच ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह’ उभारून त्याचे लोकार्पणही पूर्ण केले आहे. मात्र बदलापुरात तसाच निर्णय घेऊनही नाट्यगृहाची उभारणी रखडली आहे. बदलापूरच्या सांस्कृतिक ओळखीला अधोरेखित करणारे सुसज्ज नाट्यगृह उभारावे, अशी नागरिकांची मागणी अनेक वर्षांपासून होती. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून १४.१४ कोटी रुपयांचा निधी २९ मार्च २०१५ रोजी राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून मंजूर करून घेतला होता.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीला या निधीच्या विनियोगाचे अधिकार देण्यात आले होते. मात्र नगर परिषद प्रशासनाने नाट्यगृहासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, परिणामी निधी वापरला न गेल्याने तो शासनाकडे परत गेला. त्यामुळे बदलापूरकरांचे नाट्यगृहाचे स्वप्न कोलमडले आहे.
शहरातील कात्रप विद्यालयाजवळील जागा विकास आराखड्यात नाट्यगृहासाठी आरक्षित असून, हिरव्यागार डोंगरांच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर नाट्यगृहाची उभारणी होऊ शकली असती. मात्र नगर परिषदेची उदासीन भूमिका आणि प्रशासकीय अकार्यक्षमता यामुळे ही प्रक्रिया आजही रखडलेली आहे.
आठ कोटींचे नुकसान
सन २०१५ मध्ये या जागेचे मूल्य रेडी रेकनरनुसार सुमारे ४ कोटी रुपये होते. सध्याच्या दरानुसार या जागेचे मूल्य जवळपास १२ कोटी रुपये झाले असून, भूसंपादनात झालेल्या विलंबामुळे नगर परिषदेला तब्बल ८ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे.
आणखी ५ वर्षांचा विलंब
आता जरी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या तरी शासनाकडून निधी मिळविणे, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे आणि आराखडा तयार करणे यासाठी किमान ३ वर्षे, तर बांधकाम पूर्ण करून लोकार्पण होण्यासाठी आणखी २ वर्षांचा कालावधी लागेल. म्हणजेच बदलापुरात नाटकाची घंटा वाजण्यासाठी किमान पाच वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बदलापुरात नाट्यगृह उभारण्यासाठी तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा शासनाकडून निधी मिळविण्याची गरज आहे. मात्र प्रशासन आणि स्थानिक सत्ताधारी या दोघांची भूमिकाच उदासीन आहे. नगर परिषदेने पुढाकार घेतल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देता येईल.
कालिदास देशमुख, प्रदेश चिटणीस (राष्ट्रवादी एसपी)