

विजय पंचमुख /बदलापूर
तब्बल साडेदहा वर्षानंतर झालेल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह नक्कीच दिसला, मात्र प्रत्यक्षात मतदान टक्का अपेक्षेइतका वाढला नाही. अंदाजानुसार मतदानाचा टक्का सुमारे ६५% पर्यंत पोहचेल, असा अंदाज होता; मात्र संध्याकाळी ५.३० पर्यंत सरासरी फक्त ५८.३०% मतदान झाले.
यंदा द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे प्रत्येक मतदाराला एकाच वेळी तीन मतपत्रके भरावी लागली, ज्यामुळे मतदानासाठी अधिक वेळ लागला हीच यामागचे मुख्य कारण ठरले आहे. सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा दिसत होत्या. अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे खोळंबा निर्माण झाला. काही मतदारांना तीन मतांची पद्धत समजत न आल्याने प्रक्रियेत आणखी वेळ लागला. २०१५ नंतर पहिल्यांदाच नगर परिषद निवडणूक संपन्न होत होती. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये उत्साह होता.
त्यामुळे नोकरदार आणि खासगी क्षेत्रातील मतदार सकाळी मतदानासाठी केंद्रांवर आले, मात्र लांब रांगा पाहून अनेकांनी मतदान टाळले किंवा थेट कार्यालयात जाणे पसंत केले.
तीन मतांच्या प्रक्रियेचा मतदानाला फटका
मतदार यादीतील त्रुटी आणि घोळमुळेही गोंधळ निर्माण झाला. सायंकाळी ५.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार काही प्रभागांमध्ये मतदान टक्का ७०% पर्यंत पोहोचला, तर काही प्रभागांमध्ये ४७% वर स्थिरावला. रात्री उशिरापर्यंत अंतिम मतदान टक्केवारी संकलित करण्याचे काम सुरू होते. मतदार आणि उमेदवारांच्या उत्साहामुळे गर्दी निश्चितच दिसली, मात्र तीन मतांच्या प्रक्रियेमुळे सरासरी टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिला, असे मत निवडणूक अधिकारी व्यक्त करत आहेत.