बदलापुरातील दोन चिमुकल्यांवरील अमानवीय अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराबाबत सध्या मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये मरण पावलेल्या शिंदेच्या अंत्यविधीला नागरिकांनी तीव्र विरोध केल्यामुळे कुटुंबियांनी गुप्तपणे जागेचा शोध सुरू केला आहे. कुटुंबियांना दफनभूमीसाठी जागा मिळत नसल्याने त्यांनी हायकोर्टात याबाबत धाव घेतली आहे. शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाने सहमती दर्शवली.
गुरुवारी अक्षयच्या आई आणि नातेवाईकांनी अंबरनाथ पश्चिमेतील हिंदू स्मशानभूमीची पाहणी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार आहे. मात्र, बदलापुरातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता अंत्यसंस्कारासाठी योग्य जागेचा शोध सुरू असून अंबरनाथमध्ये अंत्यविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अक्षय शिंदेवर बदलापुरात अंत्यसंस्कार होऊ नयेत, अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी पाहणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप अंतिम जागा निश्चित झालेली नाही,या प्रकरणात गुप्तता पाळली जात आहे. अंबरनाथ येथील स्मशानभूमीची पाहणी झाल्याने आता अंत्यविधी अंबरनाथमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे, मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पडत असल्याचे दिसून येत आहे.
मृतदेह ठाण्यात पुरण्यास मनसेचा विरोध
अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी ठाण्यात किंवा कळव्यात जागा शोधण्यात येत असली तरी, अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी ठाण्यात आणि कळव्यात पुरण्यास मनसेने विरोध केला आहे. मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या पवित्र भूमीत पुरण्यास नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्याने त्याचा मृतदेह कळव्यात पुरू देणार नसल्याचे म्हटले आहे. जर या ठिकाणी मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येणार आहे. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना त्याचा मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळालेली नाही. मुलाला न्याय मिळवून द्यायचा, अशी कुटुंबाची भावना आहे. कुटुंबाचीच ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह पुरला जावा. त्यामुळे मृतदेहाचे दहन न होता तो पुरला जाणार आहे. - अमित कटारनवरे, अक्षय शिंदेचे वकील