बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ

बदलापुरातील शेतकऱ्यांना भाजीपाला आणि इतर शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. शहराच्या पूर्व भागात दोन आणि पश्चिम भागात दोन, अशा चार ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या विचाराधीन आहे. Tags:
बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठ
बदलापुरात सुरू होणार शेतकरी आठवडे बाजार; पूर्व-पश्चिम भागात चार ठिकाणी बाजारपेठप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बदलापूर : बदलापुरातील शेतकऱ्यांना भाजीपाला आणि इतर शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. शहराच्या पूर्व भागात दोन आणि पश्चिम भागात दोन, अशा चार ठिकाणी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या विचाराधीन आहे.

नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली. या सभेत बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागातील नगर परिषदेच्या ताब्यात असलेल्या जागा शेतकरी आठवडे बाजारासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. बदलापूर पश्चिमेकडील बॅरेज रोड येथील कोंडोलकर आर्केड तसेच बदलापूर पूर्वेकडील जुन्या नगर परिषद कार्यालयाच्या जागेवर उभारण्यात आलेल्या फळ व भाजी मंडईच्या इमारतीत आठवडे बाजार सुरू करण्याचा विचार आहे. शहरातील उपलब्ध शासकीय जागांची पाहणी करून आणखी दोन ठिकाणीही शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली.

स्थानिकांना तात्पुरती जागा

या आठवडे बाजारात स्थानिकांना व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जागेवर कोणतेही पक्के बांधकाम करता येणार नाही. तसेच नगर परिषदेच्या किंवा प्रशासनाच्या गरजेनुसार अथवा अटी-शर्तीचा भंग झाल्यास संबंधित जागा परत घेण्याचा अधिकार नगर परिषदेकडे राहणार आहे. बाजार भरवणे, स्वच्छता राखणे तसेच इतर प्रशासकीय बाबींसाठी आवश्यक नियमावली, अटी-शर्ती आणि प्रशासकीय शुल्क निश्चित करण्याचा अधिकार नगर परिषदेकडे राहणार असल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in