बदलापुरात बॅरेज रोड ते होप इंडियादरम्यान नवा उड्डाणपूल; MMRDAकडून डीपीआरसाठी निविदा

बदलापूर शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी बॅरेज रोड ते होप इंडिया परिसरादरम्यान नवा उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय पुढे सरकत आहे.
बदलापुरात बॅरेज रोड ते होप इंडियादरम्यान नवा उड्डाणपूल; MMRDAकडून डीपीआरसाठी निविदा
बदलापुरात बॅरेज रोड ते होप इंडियादरम्यान नवा उड्डाणपूल; MMRDAकडून डीपीआरसाठी निविदा
Published on

बदलापूर : बदलापूर शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी बॅरेज रोड ते होप इंडिया परिसरादरम्यान नवा उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय पुढे सरकत आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

बदलापूर पश्चिमेतील बॅरेज रोड परिसरातून रेल्वे रूळ ओलांडून पूर्वेकडील होप इंडिया परिसरात उतरणारा हा उड्डाणपूल शहरातील पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ करणार आहे. सध्या शहरात पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी केवळ एकच उड्डाणपूल उपलब्ध असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावून लांबच लांब रांगा लागतात. दरम्यान, शहरातून JNPT to Vadodara Expressway तसेच बदलापूर ते नवी मुंबई प्रवेश नियंत्रित महामार्ग जात असला तरी अंतर्गत वाहतुकीची समस्या कायम आहे. त्यामुळे पर्यायी उड्डाणपुलांची मागणी गेल्या काही वर्षांत तीव्र झाली होती.

याआधी बेलवली येथील शिवमंदिर तलाव ते कार्मेल शाळा दरम्यान उड्डाणपूल उभारणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्याचा काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र खरवई, बॅरेज रोड आणि स्थानक परिसरातील कोंडी कायम राहण्याची शक्यता असल्याने बॅरेज रोड ते होप इंडिया उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

वाहतूककोंडीपासून दिलासा

सध्या रमेशवाडी, बदलापूर गाव आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना पूर्व भागात जाण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील गर्दीच्या उड्डाणपुलावरूनच प्रवास करावा लागतो. नव्या उड्डाणपुलामुळे हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होणार असून स्थानक परिसरातील कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच विद्यमान उड्डाणपुलावरील ताणही घटेल.

सहा महिन्यांत डीपीआर अपेक्षित

या प्रकल्पांतर्गत व्यवहार्यता अभ्यास, सविस्तर आराखडा, वाहतूक सर्वेक्षण, पुढील ४० वर्षांची वाहतूक गरज, अतिरिक्त मार्गिका, तसेच भूसंपादन, पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांशी समन्वय अशा बाबींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर सहा महिन्यांत डीपीआर सादर करणे अपेक्षित आहे. या उड्डाणपुलामुळे बदलापूरच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in