बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण : औषध विक्रेत्याला अटक

बदलापूरमधील स्त्री बीज विक्री प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी एका महिलेला अटक केल्यानंतर आता विठ्ठलवाडीमधील औषध विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली असून ही या प्रकरणातील पाचवी अटक आहे.
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण : औषध विक्रेत्याला अटक
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण : औषध विक्रेत्याला अटकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बदलापूर : बदलापूरमधील स्त्री बीज विक्री प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी एका महिलेला अटक केल्यानंतर आता विठ्ठलवाडीमधील औषध विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली असून ही या प्रकरणातील पाचवी अटक आहे.

अवैधरित्या स्त्री बीज विक्रीचे प्रकरण बदलापुरात समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तीन महिलांना अटक केल्यानंतर आणखी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला उल्हासनगरातील एका सोनोग्राफी केंद्रात काम करत होती. या केंद्रात महिलांची तपासणी केली जात असल्याचा संशय आहे. या कारवाईत संबंधित सोनोग्राफी केंद्राला टाळे ठोकण्यात आले आहे तर विठ्ठलवाडी भागातून एका औषध विक्रेत्यालाही अटक करण्यात आली आहे. हा औषध विक्रेता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्त्री बीजासंबंधीची औषधे देत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाअंती त्याला अटक केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीत आता अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. स्त्री बीज विक्री करण्यापूर्वी स्त्रीबीज विक्री करणाऱ्या महिलेला कोणत्याही वैद्यकीय खबरदारीशिवाय इंजेक्शन दिले जात होते. ज्या महिला पैशांसाठी तयार होत्या त्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता. कायद्यानुसार स्त्री बीज विक्री करत असताना शासनाच्या अटी पूर्ण कराव्या लागतात तसेच हे स्त्री बीज फक्त अधिकृत केंद्रातच दिले जाऊ शकते. विशेष म्हणजे एखादी महिला एकदाच हे स्त्री बीज देऊ शकते. मात्र या प्रकरणात काही महिला एकापेक्षा अनेक वेळा दाता म्हणून समोर आल्या होत्या. त्यांना अनेकदा स्त्री बीज निर्मितीसाठी इंजेक्शने दिली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in