उल्हासनगर : गरिबी, अज्ञान आणि पैशांची निकड याचा गैरफायदा घेत महिलांच्या गर्भाशयाशी थेट खेळ करणारे अमानुष रॅकेट बदलापूरमध्ये उघडकीला आले असले, तरी या धक्कादायक प्रकरणाचा थेट संबंध उल्हासनगर शहराशी आहे. मात्र, उल्हासनगर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अजूनही झोपेतच असल्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. गर्भाशय अंडी विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार महिलांपैकी तीन महिला उल्हासनगरच्या रहिवासी आहेत. त्यामुळे उल्हासनगरपालिकेतील आरोग्य विभागाला याची माहिती नव्हती की, जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा प्रश्न विचारला जात आहे.
बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरात सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश बदलापूर पूर्व पोलिसांनी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने संयुक्त कारवाईत केला. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत या प्रकरणात आतापर्यंत चार महिलांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बदलापूर येथील सुलक्षणा गाडेकरसह उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे आणि सोनल गरेवाल यांचा समावेश आहे.
असा सुरू होता गोरखधंदा
आरोपी महिलांकडून गरजू महिलांना हेरून त्यांना पैशांचे आमीष दाखवले जात होते. डॉक्टरांचा कोणताही सल्ला किंवा वैध परवानगी नसताना बेकायदेशीर सोनोग्राफी करून हार्मोन्स व इंजेक्शन्स दिली जात होती. गर्भाशयातील स्त्रीबीजांची संख्या वाढल्यानंतर या महिलांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून शस्त्रक्रियेद्वारे अंडी काढली जात आणि त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
डोनरचे शारीरिक, मानसिक शोषण
छाप्यात आरोपींच्या ताब्यातून गर्भधारणेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, खोट्या नावांची सत्यप्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वारंवार डोनर म्हणून वापर करून महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
नजरेतून या गोष्टी कशा सुटल्या
या संपूर्ण प्रकरणात उल्हासनगर शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उल्हासनगरमध्ये वास्तव्याला असलेल्या महिलांचा अशा प्रकारे वापर होत असताना उल्हासनगर महापालिकेतील स्थानिक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नर्सिंग होम नोंदणी विभाग, सोनोग्राफी केंद्रांवरील नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करत होती, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बेकायदेशीर सोनोग्राफी, इंजेक्शन पुरवठा आणि आयव्हीएफशी संबंधित हालचाली शहरातील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नजरेतून कशा सुटल्या, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
डॉक्टर्स, औषध पुरवठादारांची झाडाझडती घ्या!
या रॅकेटमध्ये उल्हासनगर शहरातील डॉक्टर, मध्यस्थ, आयव्हीएफ केंद्र किंवा औषध पुरवठादारांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. हे प्रकरण केवळ बदलापूरपुरते मर्यादित नसून उल्हासनगरसारख्या शहरातील आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेवर आणि महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने शहरातील डॉक्टर्स, आयव्हीएफ केंद्रे आणि औषध पुरवठादारांची झाडाझडती घ्या, अशी मागणी शहरवासी करत आहेत.