

मुंबई : कॅबिनेटच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या नुकत्याच मिळालेल्या मंजुरीनंतर रेल्वे मंत्रालय, भारत सरकारने बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका (चौपदरीकरण प्रकल्प) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प ३ बी (एमयूटीपी-३-बी) अंतर्गत मंजूर केली आहे. हा प्रकल्प मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) लिमिटेड यांनी सादर केलेल्या व्यापक एमयूटीपी-३बी प्रस्तावाचा भाग असून त्याला महाराष्ट्र सरकारची पूर्व सहमती या आधीच मिळाली आहे. यात बदलापूर–कर्जत विभागाचा चौपदरीकरण प्रकल्पही समाविष्ट असून त्यामुळे उपनगरीय तसेच लांब पल्ल्यांची रेल्वे सेवा अधिक गतीमान आणि सुरळीत होणार आहे. दरम्यान, हा प्रकल्प जमीन संपादनानंतर तीन ते चार वर्षांच्या आत पूर्ण होण्याचे अपेक्षा आहे.
१ हजार ३२४ कोटींची प्रकल्प
हा मंजूर प्रकल्प विद्यमान रेल्वे मार्गाच्या समांतर ३२.४६ किलोमीटर लांबीमध्ये उभारला जाणार आहे. यामध्ये सहा उपनगरीय स्थानके येतात. यात बदलापूर, वांगणी, शेलू, नेरल, भिवपुरी रोड, कर्जत यांचा समावेश आहे. अंमलबजावणीसाठी अंदाजे ३७.७९ हेक्टर खासगी जमीन आवश्यक असेल.
गर्दी कमी होणार, प्रवाशांची सुरक्षा वाढणार
हा प्रकल्प मुंबई–चेन्नई उच्च घनता मार्गिकावरील क्षमता वाढीसाठी महत्त्वाचा असून हा देशातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक आहे. आगामी बंदरे, लॉजिस्टिक टर्मिनल्स तसेच मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारणाऱ्या उपनगर केंद्रांशी निगडित वाढती माल वाहतूक आणि प्रवाशांची गतिशीलता हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. प्रकल्पामुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये अधिक सुसूत्र विभाजन, स्थानकांवरील गर्दी कमी होणार, गाड्यांसाठी सुधारित वेळापत्रक लवचिकता आणि संरक्षण कामे तसेच स्थानक गतिशीलता सुधारणा उपायांद्वारे प्रवासी सुरक्षेत वाढ करण्यास मदत होणार आहे.
बदलापूर–कर्जत चौपदरीकरण प्रकल्प हा मुंबईच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्तारातील भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठीचा एक आवश्यक टप्पा आहे. या अतिरिक्त मार्गिकांमुळे उपनगरीय प्रवासी तसेच मुख्य मार्गावरील प्रवासी वाहतूक अधिक सुरळीत होईल, आणि या हाई डेंसिटी मार्गिकेवरील माल वाहतूकही अधिक कार्यक्षम बनेल. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे परिचालनाची सुरक्षा व विश्वासार्हता अधिक बळकट होईल.
विलास वाडेकर, सीएमडी, एमआरव्हीसी