Badlapur : लोकलच्या विलंबामुळे रेल्वे प्रवासी संतप्त; वातानुकूलित तसेच एक्स्प्रेस गाड्यांमुळे चाकरमानी त्रस्त

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे बदलापूरकर चाकरमानी त्रस्त झाले आहेत. गर्दीने गच्च भरलेल्या लोकलमध्ये होणारी धक्काबुक्की, वेळेवर कार्यालयात पोहोचता न आल्याने लागणारे ‘लेटमार्क’ आणि रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल प्रवाशांचा रोष उफाळून आला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे बदलापूरकर चाकरमानी त्रस्त झाले आहेत. गर्दीने गच्च भरलेल्या लोकलमध्ये होणारी धक्काबुक्की, वेळेवर कार्यालयात पोहोचता न आल्याने लागणारे ‘लेटमार्क’ आणि रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल प्रवाशांचा रोष उफाळून आला आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा लोकलला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा विलंब झाल्याने प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला.

बदलापूर स्थानकातून सकाळी सुटणारी ७.१४ ची लोकल नेहमीप्रमाणे पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, या लोकलच्या आधी एक्स्प्रेस गाडीला प्राधान्य दिल्याने खोपोली-मुंबई लोकल तब्बल ४५ मिनिटे उशिराने आली. या विलंबामुळे बदलापूर स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती. प्रवाशांना चाकरमान्यांच्या पीक अवरमध्ये प्रवास करणे अक्षरशः कठीण झाले.

गेल्या काही दिवसांपासून हीच परिस्थिती कायम असल्याने प्रवाशांचा संयम सुटला. प्रवाशांनी एकत्र येत स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर जमून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संतप्त स्वरात जाब विचारला. काही प्रवाशांनी तर ही परिस्थिती रोजचीच असल्याचा आरोप करत, रेल्वे प्रशासनाने आमच्या समस्यांकडे डोळेझाक केल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या मते, लोकलचा हा विलंब केवळ एक दिवसाचा प्रश्न नाही, तर मध्य रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोजच या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने सामान्य लोकलपेक्षा वातानुकूलित लोकलला अधिक प्राध्यान्य देत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. सामान्य लोकलला विलंब तर वातानुकूलित लोकलला वेळेवर असा पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे चित्र नेहमी पहावयास मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

रेल्वे प्रशासनावर टीका

रेल्वे प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी रेल्वेचा वेळ म्हणजे अंदाजपत्रक नाही, तर कोडे बनले आहे, अशा शब्दांत प्रशासनावर टीका केली. यापूर्वीही बदलापूरसह अंबरनाथ, वांगणी आणि नेरळ येथे लोकल विलंबाच्या मुद्द्यावर ‘रेल रोको’सारखी आंदोलने झाली होती.

प्रवाशांच्या तुलनेत लोकलची संख्या अपुरी

कर्जत, भिवपुरी, नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमधून दररोज लाखो प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. मात्र प्रवाशांच्या तुलनेत लोकलगाड्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी लोकलमधील गर्दी वाढली आहे आणि प्रवास अत्यंत दगदगीचा झाला आहे. यामध्ये तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणेतील अडथळे आणि रुळांवरील कामे या कारणांमुळे लोकल वारंवार उशिरा धावतात.

logo
marathi.freepressjournal.in