Badlapur Case: ‘हाच तो काठीवाला दादा’, पीडित मुलींनी अक्षय शिंदेला ओळखले!

Badlapur Minors Sexual Abuse Case: आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड कल्याण कोर्टात पार पडली. यावेळी पीडित मुलींनी "हाच तो काठीवाला दादा" म्हणून ओळख दिल्यामुळे एसआयटीकडून चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Badlapur Case: ‘हाच तो काठीवाला दादा’, पीडित मुलींनी अक्षय शिंदेला ओळखले!
Published on

उल्हासनगर : बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात शनिवारी एक मोठी कारवाई करण्यात आली. आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड कल्याण कोर्टात पार पडली. यावेळी पीडित मुलींनी "हाच तो काठीवाला दादा" म्हणून ओळख दिल्यामुळे एसआयटीकडून चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

शुक्रवारी, न्यायालयाने विशेष तपास पथकाला (एसआयटी) आरोपी अक्षय शिंदेची ओळख परेड करण्याची परवानगी दिली होती. तद्नुसार, शनिवारी आरोपीला तळोजा जेलमधून कडक बंदोबस्तात कल्याण कोर्टात आणण्यात आले. ओळख परेडीच्या वेळी पाच पंच उपस्थित होते, जे या प्रकरणाशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हते, तसेच त्यांनी पीडित मुलींना कधीच पाहिले नव्हते. ओळख परेड सुरू होताच, पीडित मुलींनी आरोपीकडे बोट दाखवत "हाच तो काठीवाला दादा" असे स्पष्टपणे सांगितले. यामुळे आरोपी अक्षय शिंदेची स्थिती आणखी कठीण झाली आहे. बदलापुरातील या घृणास्पद घटनेने संपूर्ण शहर ढवळून निघाले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. या घटनेची पुढील सुनावणी आणि निर्णयावर संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.

एसआयटीचा चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग मोकळा

ओळख परेडमध्ये पीडित मुलींनी अक्षय शिंदे याला ओळखल्याने आता एसआयटीकडून या प्रकरणात जलद गतीने चार्जशीट दाखल करण्याची तयारी सुरू आहे. एसआयटीचे अधिकारी या प्रकरणातील प्रत्येक घटनेची नीट छाननी करून, सर्व पुरावे गोळा करत आहेत, ज्यामुळे आरोपीवर दोषारोप ठरवणे सोपे जाईल. या अत्याचार प्रकरणाच्या गुन्हेगारी स्वरूपामुळे, या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात केली जाणार आहे. समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे, तातडीने आणि कठोर न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in