

विजय पंचमुख / बदलापूर
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. आघाडीने समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाल्याने महाविकास आघाडीचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा दावा आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडीच्या नावाने एकत्र लढवणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय (आर. के.), भारत मुक्ती मोर्चा आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांनाही महाविकास आघाडीत सामावून घेण्यात येणार आहे. दरम्यान, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही महायुतीत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितले.
खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनीही येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीचे प्रभागनिहाय उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले.
स्थानिक पातळीवर घेतलेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी जनतेसमोर एक सक्षम आणि पर्यायी शक्ती म्हणून उभी राहील.
संजय जाधव, शहराध्यक्ष काँग्रेस