
बदलापूर : गेल्या काही महिन्यांपासून बदलापुरात सुरू असलेला विजेचा लपंडाव लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. यावर उपाय म्हणून महावितरणने बदलापूरसाठी मोरीवली उपकेंद्रातून स्वतंत्र वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले असून त्यामुळे बदलापुरात सुरू असलेला विजेचा लपंडाव संपेल, अशी अपेक्षा आहे.
बदलापुरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण आहेत. बदलापुरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या मुद्द्यावर महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र त्यानंतरही परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही समस्या मांडली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यावर उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महावितरणकडून अंबरनाथच्या मोरीवली उपकेंद्रातून बदलापूरपर्यंत नवी लाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तब्बल १६ किलोमीटर लांबीची केबल आणि ४० ट्रान्सफॉर्मर यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुढील महिनाभरात हे काम पूर्ण होऊन बदलापुरातील विजेचा लपंडाव संपणे अपेक्षित आहे. नुकतेच भाजपचे बदलापूर पूर्व शहराध्यक्ष रमेश सोळसे, ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे, माजी शहराध्यक्ष शरद तेली आदींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह या कामाची पाहणी केली.
टाटा पॉवरकडून १८० मेगावाॅट वीज
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या आरक्षण क्रमांक १८ च्या सर्वेक्षण क्रमांक ४८ आणि ४९ भुखंडांवरील ३.७० एकर जागा देण्याची तयारी दर्शवली असून काही महिन्यांपूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बदलापुरात येऊन या जागेची पाहणी केली होती. टाटा पॉवर कंपनी येथे ९०-९० मेगावाॅट क्षमतेचे दोन उपकेंद्र उभारणार आहे. खरवईत ४, कात्रपमध्ये २ तर शिरगाव आणि पोद्दार प्रकल्पात प्रत्येकी एक फीडरच्या माध्यमातून ही वीज महावितरणाला देण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पूर्णत्वास गेल्यास शहराला अतिरिक्त १८० मेगावाॅट वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाढत्या मागणीनुसार वीजपुरवठा करणे महावितरणला शक्य होणार आहे.