बदलापुरात दोन महिन्यांत डॉग शेल्टर उभारणार; 'प्रोजेक्ट संवेदना'ला गती; शहरात ३२ डॉग फीडिंग पॉइंट्स उभारणार

बदलापूर शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न सोडविण्यासोबतच त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने ‘प्रोजेक्ट संवेदना’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
बदलापुरात दोन महिन्यांत डॉग शेल्टर उभारणार; 'प्रोजेक्ट संवेदना'ला गती; शहरात ३२ डॉग फीडिंग पॉइंट्स उभारणार
बदलापुरात दोन महिन्यांत डॉग शेल्टर उभारणार; 'प्रोजेक्ट संवेदना'ला गती; शहरात ३२ डॉग फीडिंग पॉइंट्स उभारणारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

बदलापूर : शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न सोडविण्यासोबतच त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने ‘प्रोजेक्ट संवेदना’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शहरात सर्व सुविधांनी युक्त डॉग शेल्टर उभारण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत डॉग शेल्टर आणि डॉग फीडिंग स्पॉट उभारण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार बदलापूर पूर्वेकडील कात्रप परिसरात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्राशेजारी डॉग शेल्टर उभारले जाणार आहे.

या शेल्टरमध्ये भटक्या श्वानांचे शास्त्रीय पद्धतीने निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात येईल. तसेच जखमी व आजारी श्वानांवर वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एका संस्थेमार्फत या केंद्राचे व्यवस्थापन केले जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

‘प्रोजेक्ट संवेदना’चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरात विविध ठिकाणी ३२ डॉग फीडिंग पॉइंट्स उभारण्यात येणार आहेत. श्वानप्रेमींना रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ टाकण्याऐवजी या निश्चित ठिकाणी श्वानांना खाद्य देता येणार आहे. त्यामुळे शहरातील अस्वच्छता कमी होण्यास मदत होईल. हे फीडिंग पॉइंट्स नागरी वस्तीपासून दूर आणि मोकळ्या जागांमध्ये उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. या उपक्रमात बदलापूरमधील २५० हून अधिक श्वानप्रेमी सहभागी होणार आहेत.

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण, उपचार आणि नियोजनबद्ध खाद्यव्यवस्था यांची सांगड घालणाऱ्या या प्रकल्पामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे कल्याण या दोन्ही बाबींना महत्त्व मिळणार आहे. त्यामुळे ‘प्रोजेक्ट संवेदना’ शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरात १२ हजारांहून अधिक श्वान

नगरपरिषद क्षेत्रात सध्या सुमारे १० हजार ४०९ भटके श्वान आणि १ हजार ७५९ पाळीव श्वान आहेत. म्हणजेच शहरात एकूण १२ हजार १६८ श्वानांची नोंद आहे. यापूर्वी नगरपरिषदेने भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, शस्त्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मे. प्रतापराव राणे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची नियुक्ती केली होती. कात्रप येथील निर्बीजीकरण केंद्रात ९०९ पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.या संस्थेमार्फत २०२३-२४ मध्ये ३९४, २०२४-२५ मध्ये १ हजार ५२०, तर २०२५-२६ मध्ये जानेवारी २०२६ पर्यंत ३ हजार २४२ श्वानांचे निर्बीजीकरण आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)