

बदलापूर : घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडविरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. ग्राहकांना वाढीव गॅस बिले येत असून त्याकडे कंपनीकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच ग्राहक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महानगर गॅसच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत देशभरात चर्चा सुरू आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित झाल्याने हॉटेल, केटरिंग व्यावसायिक आणि लग्नसमारंभाचे सभागृह व्यवस्थापक चिंतेत आहेत. मात्र घरगुती गॅसचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. महानगर गॅस लिमिटेडमार्फत बदलापूरमध्ये घरगुती पीएनजी (पाईपद्वारे गॅस) जोडणीद्वारे गॅस पुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांत ग्राहकांना वाढीव बिले येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. या तक्रारींचा योग्य निपटारा केला जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तासनतास थांबवून ठेवले जाते आणि त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, अशा तक्रारीही करण्यात आल्या.
ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी लवकरच बदलापूरमध्ये ग्राहक समस्या मेळावा आयोजित केला जाणार आहे. ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध असून तक्रार निवारण यंत्रणा आणखी बळकट करण्यात येईल.
नीरा अस्थाना, जनसंपर्क अधिकारी महानगर गॅस
गॅस पुरवठ्यावर परिणाम नाही
युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरबाबत राज्यभरात चर्चा सुरू असली तरी पीएनजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही. महानगर गॅसचा पुरवठा अखंडित सुरू असून त्यात कोणताही खंड पडणार नाही. ग्राहकांनी चिंता करू नये, असेही जनसंपर्क अधिकारी नीरा अस्थाना यांनी स्पष्ट केले.