उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील शांतीनगर स्मशानभूमीत रविवारी अक्षय शिंदे याच्या दफनविधी दरम्यान मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर, प्रशासनाने तत्काळ सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. दफन झालेल्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शांतीनगर स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यामागे उद्देश हा आहे की परिसरातील हालचालींवर सतत नजर ठेवता येईल आणि कोणत्याही अनुचित घटनेला प्रतिबंध घालता येईल. या सीसीटीव्ही यंत्रणेच्या साहाय्याने, दफनभूमी स्थळाच्या आसपासच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आटोक्यात ठेवता येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच, प्रशासनाने या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी अक्षय शिंदे याच्या दफनविधीला स्थानिक नागरिक आणि काही राजकीय नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवला होता.
बदलापूर आंदोलकांवरील गुन्हे लवकरच मागे घेणार?
बदलापूर : बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बदलापूर आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करून निवेदन सादर केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले.