बदलापूर शहरातील रस्त्यांवर मलमपट्टीचे काम सुरूच; आता 'जोर का झटका, धीरे से लगे', नागरिकांमध्ये नाराजी

गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेल्या बदलापूर शहरातील रस्त्यांची अखेर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने डागडुजी केली आहे.
बदलापूर शहरातील रस्त्यांवर मलमपट्टीचे काम सुरूच; आता 'जोर का झटका, धीरे से लगे', नागरिकांमध्ये नाराजी
संग्रहित छायाचित्र
Published on

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेल्या बदलापूर शहरातील रस्त्यांची अखेर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने डागडुजी केली आहे. मात्र, तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब न करता करण्यात आलेली ही डागडुजी म्हणजे केवळ मलमपट्टी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवले असले तरी पुढील काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडणार नाहीत ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिणामी, बदलापूरकरांना 'जोर का झटका, धीरे से लगे' असा अनुभव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात वाहनाने ये-जा करण्यासाठी जुन्या नगर परिषद कार्यालयासमोरून जाणारा उड्डाणपूल हा प्रमुख दुवा आहे. दररोज हजारो वाहने या उड्डाणपुलावरून ये-जा करतात.

यामध्ये रिक्षा, दुचाकी, हलकी व अवजड चारचाकी वाहने तसेच स्कूल बसचाही समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्ता खड्डेमुक्त आणि सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे.

दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाला नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. यंदाही पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची तंत्रशुद्ध पद्धतीने डागडुजी करून नागरिकांची गैरसोय दूर करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाचे वा कामाकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाळा सुरू होऊन जेमतेम महिनाभर होताच रस्त्याची खड्यांमुळे दुरवस्था झाली. शहरातील इतर काही रस्त्यांवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. काँक्रिटच्या रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक खचल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर हे खड्डे अधिकच मोठे होत गेले. परिणामी, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

तंत्रशुद्ध पद्धतीने रस्त्यांची डागडुजी व्हावी

बदलापुरात दरवर्षी पावसाळ्यात खड्डे बुजवले जातात; मात्र अल्पावधीतच त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण होतात, हा बदलापूरकरांचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या कार्यपद्धतीकडे पाहता, त्यांच्या कार्यकाळात खड्ढे भरण्याचा हा 'बदलापूर पॅटर्न' बदलेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, सध्या 'मुख्याधिकारी जोमात, पण बाधकाम विभाग कोमात' अशी परिस्थिती असल्याची चर्चा शहरात आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने खड्डे न भरता थातूरमातूर पद्धतीने करण्यात आलेली डागडुजी ही केवळ मलमपट्टी ठरत असल्याचे मत शहरातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत. खड्ढे भरण्यापूर्वी रस्त्याची योग्य प्रकारे साफसफाई, आवश्यक खोदकाम आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून काम करण्यात यावे, अशी अपेक्षा आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in