बदलापूरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय; परिवहन मंत्र्यांनी दिली तत्त्वतः मंजुरी; मुरबाड, अंबरनाथकरांनाही दिलासा!

बदलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार असल्याने आता वाहनधारकांची लायसन्स काढणे, नूतनीकरण करणे, परमिट काढणे, वाहन रजिस्ट्रेशन करणे, नंबर घेणे व वाहनासंबंधी सर्व कामे बदलापूर येथेच होणार आहेत.
बदलापूरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय; परिवहन मंत्र्यांनी दिली तत्त्वतः मंजुरी; मुरबाड, अंबरनाथकरांनाही दिलासा!
Published on

बदलापूर : लवकरच बदलापुरात स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार किसन कथोरे यांनी यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओ कार्यालय सुरू करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

आमदार किसन कथोरे यांच्या मागणीनुसार सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात बदलापूरच्या स्वतंत्र आरटीओ कार्यालयाबाबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी आमदार किसन कथोरे यांच्यासह परिवहन आयुक्त विवेक भीमनवर, कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मारुती गायकवाड व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी बदलापूरच्या स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास तत्त्वत: मंजुरी दिली. तसेच त्याअनुषंगाने परिवहन विभागाने नगरपरिषदेकडून जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून जागा ताब्यात घ्यावी, असे निर्देश दिले. यासाठी मंजुरी व निधी दिला जाणार आहे.

मुरबाड, अंबरनाथकरांनाही दिलासा

बदलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार असल्याने आता वाहनधारकांची लायसन्स काढणे, नूतनीकरण करणे, परमिट काढणे, वाहन रजिस्ट्रेशन करणे, नंबर घेणे व वाहनासंबंधी सर्व कामे बदलापूर येथेच होणार आहेत. या कामांसाठी बदलापूरकरांना आता कल्याणला जाण्याची गरज भासणार नाही. बदलापूरसह मुरबाड, अंबरनाथ व लगतच्या ग्रामीण भागातील वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in