बदलापूरची ‘ती’ लेक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत...सरकारी आश्वासने हवेतच, मनसेकडून मदतीचा हात

एका आईच्या डोळ्यातील काळजी, मुलीच्या भविष्याची असलेली धास्ती आणि शिक्षण टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड… बदलापूरमधील ‘सानिका’ (बदललेले नाव) या चिमुरडीची कहाणी सध्या मन हेलावून टाकणारी ठरत आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील त्या दुर्दैवी घटनेला आता दोन वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी...
बदलापूरची ‘ती’ लेक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत...सरकारी आश्वासने हवेतच, मनसेकडून मदतीचा हात
'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

ठाणे/बदलापूर : एका आईच्या डोळ्यातील काळजी, मुलीच्या भविष्याची असलेली धास्ती आणि शिक्षण टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड… बदलापूरमधील ‘सानिका’ (बदललेले नाव) या चिमुरडीची कहाणी सध्या मन हेलावून टाकणारी ठरत आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील त्या दुर्दैवी घटनेला आता दोन वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी न्याय आणि शिक्षणासाठीचा संघर्ष अजूनही कायम आहे.

घटनेनंतर शासनाने या विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तिच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलणार असल्याचे सांगितले होते तसेच पुढे पदवीपर्यंतची जबाबदारी घेण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, अशी तक्रार पीडित कुटुंबाकडून करण्यात येत आहे. मुलीच्या वडिलांनी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. उलट शाळेकडून थकलेल्या फीबाबत तगादा लावला जात असल्याने कुटुंबाची चिंता वाढली आहे. या प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. दरम्यान, शिक्षणासारख्या मूलभूत हक्कासाठीही या कुटुंबाला संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, मुलीच्या भविष्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांनुसार मदत करावी, अशी विनंती मुलीच्या वडिलांनी केली आहे.

ही लाजीरवाणी बाब

पीडित मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे पाहून तिच्या वडिलांनी मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची जाणीव होताच पाचंगे यांनी तत्काळ पुढाकार घेत हायस्कूलची गतवर्षीची ३२,००० रुपयांची थकलेली फी स्वतःच्या खिशातून चेकद्वारे भरली. एकीकडे सरकार समृद्ध राज्याच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे अन्यायग्रस्त चिमुरडीला दिलेल्या शब्दाला जागत नाही, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका पाचंगे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in