Badlapur school sex abuse: आरोपी अक्षय शिंदेविरोधात आणखी एक गुन्हा, पुन्हा पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता

बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.
Badlapur school sex abuse: आरोपी अक्षय शिंदेविरोधात आणखी एक गुन्हा, पुन्हा पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता
Published on

उल्हासनगर : बदलापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. यापूर्वीच या प्रकरणामुळे समाजमन अस्वस्थ झाले असताना, शाळेतील आणखी एका चिमुकलीवर अत्याचार केल्याचे समजताच नागरिकांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या नवीन प्रकरणाची तपासणी केली असून, नराधम अक्षय शिंदे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील आणखी एका चिमुकलीवर त्याने अत्याचार केल्याची बाब तपासातून समोर आली आहे.

याआधीच अक्षय शिंदे हा न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास जोरात सुरू असून, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

'पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे न्याय मिळण्यात अडचणी'

बदलापूरमधील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील ॲड. असीम सरोदे यांनी कल्याण न्यायालयात तब्बल पाऊण तास सखोल युक्तीवाद केला. या युक्तिवादात त्यांनी पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत, त्यांच्या हलगर्जीपणामुळे पीडितांना न्याय मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. ॲड. असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर त्रुटी ठेवल्या आहेत. एफआयआरमध्ये अनेक महत्त्वाची कलमे लावली गेली नाहीत. त्यामुळे तपासाची दिशा चुकीची झाली आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पीडित मुलीचे नाव, पत्ता आणि तिच्या कुटुंबीयांचा फोन नंबर स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे पोक्सो कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in