Badlapur: शहरांतर्गत बस सेवेची अजूनही प्रतीक्षा; जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत टळली; KDMC मार्फत बदलापूरकरांना १० बस?

बदलापूर शहरांतर्गत बससेवा सुरू होणार असल्याच्या चर्चा मागील दोन वर्षांपासून सुरू आहेत. जानेवारी २०२४ पर्यंत ही बससेवा सुरू होणे अपेक्षित असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
Badlapur: शहरांतर्गत बस सेवेची अजूनही प्रतीक्षा; जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत टळली; KDMC मार्फत बदलापूरकरांना १० बस?
Published on

विजय पंचमुख/बदलापूर

बदलापूर शहरांतर्गत बससेवा सुरू होणार असल्याच्या चर्चा मागील दोन वर्षांपासून सुरू आहेत. जानेवारी २०२४ पर्यंत ही बससेवा सुरू होणे अपेक्षित असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र वर्षाचा शेवटचा महिना संपत आला तरी शहरांतर्गतची बससेवा कागदावरच राहिल्याची चर्चा सुरू आहे.

बदलापुरात कोणतीही परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी बदलापुरात शहरांतर्गत बससेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. बसचा उपक्रम सुरू करण्यासाठी बस खरेदी, कर्मचारी व इतर सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. त्याशिवाय हा उपक्रम फायद्याचा नसला तरी नागरिकांच्या सोयीसाठी सुरू ठेवावा लागतो. अशावेळी महानगरपालिका इतर उत्पन्नातून ही तूट भरून काढू शकतात. परंतु नगर परिषदांना हे शक्य होत नाही. त्यामुळे नगर परिषदेची स्वतःची परिवहन सेवा न सुरू न करता कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून बदलापुरात शहरांतर्गत बससेवा सुरू करण्यासाठी बस उपलब्ध करून घेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सुमारे २०० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार असल्याचे समजल्याने मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यातील काही बसची सेवा बदलापुरात देण्याची विनंती केली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने बदलापुरात अंतर्गत बससेवा सुरू करण्यासाठी १० बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र इतर शहरात बससेवा देताना तोटा होऊ नये,बस मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळावा, अशी संबंधित महानगरपालिकांची अपेक्षा होती.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागानेही बससेवेच्या मार्गाचा आराखडा सादर करण्यास सांगितले. त्यानुसार कुळगाव -बदलापूर नगर परिषदेने यासाठी कन्सल्टंटची नेमणूक करून हा आराखडा तयार केला. हा आराखडा केडीएमटीला सादरही करण्यात आला. मात्र केडीएमटीची इलेक्ट्रिक बस खरेदी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

ही प्रक्रिया पूर्ण होऊन बस उपलब्ध होताच पुढील प्रक्रियेला वेग येणार असल्याचे योगेश गोडसे यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता गोडसे यांची बदली झाल्यानंतर शहरांतर्गत बससेवेचा विषयही थंडावला आहे. त्यामुळे नवे मुख्याधिकारी मारुती गायकवाड याबाबत काय भूमिका घेणार, हे महत्वाचे ठरणार आहे.

चाकरमान्यांना नव्या पर्यायाची वाट

बदलापूर शहराची लोकसंख्या जशी वाढत गेली तसे हे शहरही विस्तारत जवळपास अंबरनाथच्या वेशीपर्यंत पोहचले आहे. बदलापुरात बहुतांश नागरिक चाकरमानी वर्गातील असून त्यांना दररोज नोकरी व्यवसायानिमित्त बदलापूर ते मुंबई प्रवास करावा लागतो. मुंबईला जाण्यासाठी थेट बस वा अन्य सेवा उपलब्ध नसल्याने चाकरमानी रेल्वे सेवेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनपासून दूर अंतरावर राहत असलेल्या अशा नागरिकांना सकाळी कामावर जाण्यासाठी व संध्याकाळी कामावरून घरी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी रिक्षा हाच एक पर्याय आहे. शहरांतर्गत बससेवा सुरू झाल्यास या भागातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासाचा एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in