गुड न्यूज! वर्षभरात बदलापूर ते पनवेल अंतर @२० मिनिट; बोगद्याचे ५० टक्के काम पूर्ण

महाराष्ट्रात वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. हा महामार्ग बदलापूर मधून जात आहे
गुड न्यूज! वर्षभरात बदलापूर ते पनवेल अंतर @२० मिनिट;  बोगद्याचे ५० टक्के काम पूर्ण

बदलापूर : सध्या रस्ते मार्गाने बदलापूरहून पनवेलला जाण्यासाठी किमान तासाभराचा अवधी लागतो; मात्र येत्या वर्षभरात अवघ्या वीस मिनिटांत हे अंतर कापणे शक्य होण्याची चिन्हे दिसत आहेत. वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम वेगाने सुरू असून बदलापूर आणि पनवेलला जोडणाऱ्या बोगद्याचे जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सन २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे बदलापूरकरांच्या वेगवान प्रवासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

राज्यात वडोदरा ते जेएनपीटी महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे. राज्यात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा हा आठपदरी महामार्ग असून हा मार्ग बदलापूर शहरातील बेंडशीळ या गावाजवळून जात आहे. त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम मागील वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे.

बदलापूर ते पनवेलदरम्यान हा ४.१६ किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. सध्या हे काम ५० टक्के पूर्ण झाले असून जुलै २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल त्यानंतर, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे बदलापूर ते पनवेल हे अंतर अवघ्या वीस मिनिटांत कापता येणार आहे. मंगळवारी (ता.१३) आमदार किसन कथोरे यांनी वडोदरा जेएनपीटी प्रकल्पाचे अधिकारी तसेच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे व माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह या बोगद्याच्या कामाची पाहणी केली.

बदलापूरची समृद्धीकडे वाटचाल सुरू होईल

महाराष्ट्रात वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. हा महामार्ग बदलापूर मधून जात आहे त्यामुळे, बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे. पर्यायाने या ठिकाणी उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. त्यामुळे बदलापूर शहराची समृद्धीकडे वाटचाल सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वडोदरा-मुंबई महामार्गामधील सर्वात महत्त्वाचा टप्पा या चार किलोमीटर बोगद्याचा असून त्याचे काम जलद गतीने सुरू आहे. बोगद्यासोबतच महामार्गाचे काम देखील बदलापूर शहरात प्रगतिपथावर असून, ते काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे.

- सुहास चिटणीस, प्रकल्प प्रमुख

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in