बदलापुरात पाणी तापणार? पाच एमएलडी पाण्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

फेब्रुवारी अखेरीस मंत्रालयात आयोजित बैठकीत बदलापुरातील पाणी समस्या लक्षात घेता बदलापूरवासीयांना एमआयडीसीचे ५ एमएलडी पाणी १ एप्रिलपासून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
बदलापुरात पाणी तापणार? पाच एमएलडी पाण्यासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

बदलापूर : बदलापुरातील पाणी समस्या दूर करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असमर्थ ठरत आहे. त्यात एप्रिल महिन्यापासून एमआयडीसीनेही गृहसंकुलांना नवीन कनेक्शन देणे बंद केले आहे. दुसरीकडे एमआयडीसीकडून बदलापूरला ५ एमएलडी पाणी देण्याच्या राज्य शासनाच्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यातही हे ५ एमएलडी पाणी बदलापूर पश्चिम भागात वळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बदलापूर पूर्व भागातील हजारो सदनिकाधारकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व भागातील माजी नगरसेवकांनीही आता आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत बदलापुरात पाण्याच्या मुद्यावर वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

फेब्रुवारी अखेरीस मंत्रालयात आयोजित बैठकीत बदलापुरातील पाणी समस्या लक्षात घेता बदलापूरवासीयांना एमआयडीसीचे ५ एमएलडी पाणी १ एप्रिलपासून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला उद्योग विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जलसंपदा विभागाचे अधिकारी व कुळगाव- बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे तसेच नगर परिषदेतील काही माजी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. या निर्णयामुळे पाणी समस्येने हैराण असलेल्या बदलापूरकरांना काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र ६ एप्रिल उजाडला तरी अद्याप हे पाणी उपलब्ध झालेले नाही. या पाच एमएलडी पाण्यापैकी अडीच एमएलडी पाणी बदलापूर पूर्व भागात व पाच एमएलडी पाणी बदलापूर पश्चिम भागाला मिळणे अपेक्षित आहे. मात्र हे पाणी बदलापूर पश्चिम भागातच वळविण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबद्दल बदलापूर पूर्व भागातील नगर परिषदेच्या माजी लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अंबरनाथ टी सर्कल येथून एमआयडीसीच्या पाइपलाईनद्वारे आलेले पाणी पूर्वेला कार्मेल हायस्कूल समोरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाईनला जोडल्यास या ५ एमएलडी पाण्यापैकी अडीच एमएलडी पाणी बदलापूर पूर्वेसाठी आणि अडीच एमएलडी पाणी बदलापूर पश्चिमेस देणे शक्य होईल. त्यामुळे दोन्ही भागातील पाणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना न्याय देण्यासारखे होईल. असे असताना केवळ पश्चिम भागाला हे पाणी दिल्यास शहरातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या कात्रप, शिरगाव आदी भागातील नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. या पार्श्वभूमीवर पाण्याचे समसमान वाटप न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला असल्याची माहिती माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे बदलापुरात पाणीटंचाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राज्य सरकारने १ एप्रिलपासून बदलापूरला एमआयडीसीचे ५ एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजपचेच माजी नगरसेवक आंदोलनाचे इशारे देऊ लागले आहेत. त्यामुळे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.

- कालिदास देशमुख प्रदेश सचिव: राष्ट्रवादी शरद पवार गट

५६.७० एमएलडी पाण्याची आवश्यकता

बदलापूर शहराची लोकसंख्या ४ लाखांहून अधिक असून एवढ्या लोकसंख्येला ५६.७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ६९ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी ३० टक्के पाण्याचा वहन व्यय होऊन प्रत्यक्षात ४८.३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच ८.४० एमएलडी पाण्याची तफावत आढळून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंबरनाथ व बदलापूर शहराला मिळून दररोज १३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये अंबरनाथ शहराला ५५ एमएलडी व अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीला ६ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

वीस हजार नागरिक पाणीटंचाई ग्रस्त

बदलापूर पूर्वेकडील कात्रप, शिरगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे ५ हजार सदनिका बांधून तयार असून एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर इथे लोकांना पझेशन मिळेल अशी परिस्थिती आहे. या गृहसंकुलांना पाणीपुरवठा करण्याची सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची क्षमता नाही आणि एप्रिल महिन्यापासून एमआयडीसीनेही नव्या गृहसंकुलांना कनेक्शन देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सुमारे २० हजार नागरिकांना मोठ्या पाणीसमस्येला सामोरे जावे लागेल, अशी भीती भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in