बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

एल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद
बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंदसंग्रहित छायाचित्र
Published on: 

बदलापूर : एल-निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बदलापूर शहरात आठवड्यातून एक दिवस चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. ही पाणीकपात १६ ऑक्टोबरपासून लागू होणार असून, शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांत वेगवेगळ्या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि प्राधान्यक्रमानुसार व्यवस्थापन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापूर शहरात चक्राकार पद्धतीने पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे बदलापूरकरांना आठवड्यातून एक दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने घरगुती ग्राहकांनी पाणीकपातीपूर्वी मुबलक पाणीसाठा करून ठेवावा जेणेकरून टंचाई निर्माण होणार नाही, असे आवाहनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.

अंबरनाथकरांना तूर्तास दिलासा

बदलापूर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली असली, तरी अंबरनाथ शहराला तूर्तास यातून वगळण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये आधीच पाणीटंचाईची समस्या असल्याने १० टक्के पाणीकपात लागू केल्यास नागरिकांच्या नाराजीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी अंबरनाथमध्ये पाणीकपात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी, अंबरनाथकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in