सुमित घरत / भिवंडी
मुस्लिम बहुल भिवंडी शहरात इस्लाम धर्मीयांचा बकरी ईद सण याच आठवड्यात, ७ जूनपासून साजरा होणार आहे. प्रत्येक सण हा कुणासाठी श्रद्धेचा, तर कुणासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत ठरतो. भिवंडीतील बकरी ईद सणही असाच एक सण असून, तो ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेषतः आर्थिकदृष्ट्या आधारस्तंभ ठरत आहे.
भिवंडीत मोठ्या संख्येने इस्लाम धर्मीय लोक राहत असून बकरी ईद निमित्ताने हजारोंच्या संख्येने बोकड आणि रेडे यांची कुर्बानी दिली जाते. त्याकरिता १५ दिवस अगोदर बोकड आणि रेड्यांची खरेदी करीत घरी आणतात. त्यांची सेवा करून ईदच्या दिवशी कुर्बानी दिली जाते. या दरम्यान शहरात बोकड, रेड्यांच्या चाऱ्यासाठी लागणारा गवत,पेंढा आणि झाडांचा पाला विकून आदिवासी समाज आपली आर्थिक चणचण दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.
सध्या शहरातील गल्लीबोळात व मोहल्ल्यात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत आहे, त्यामुळे चाऱ्याच्या विक्रीत वाढ होत आहे. शहरातील जनावरांच्या खुल्या बाजारात ५० रुपयेप्रमाणे भाताच्या पेंढ्याची एक जुडी (मोदल) विकली जात आहे. तसेच कोटरगेट परिसरातील चांदतारा मस्जिद जवळ १० ते २० रुपये जुडीप्रमाणे गवत, भाताचा पेंढा, शिदाचा आणि उंबराच्या झाडाचा पाला आदिवासी बांधव गेल्या काही दिवसांपासून विकत असून या पैशातून मिळणाऱ्या रोजगारातून उदरनिर्वाह करीत आहेत. मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद या सणामुळे आदिवासींना चांगलेच उत्पन्न प्राप्त होत आहे. त्यामुळे सण कोणत्याही धर्माचा असो तो अनेकांना रोजगार देऊन जात असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे.
‘या’ भागाला अधिक महत्त्व
बकरी ईदनिमित्त जनावरे खरेदी करण्याचा बाजार येथील अवचितपाडा आणि खंडुपाडा येथे दरवर्षी भरत असतो, तर या जनावरांना खाण्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याचा बाजार शहरातील तीनबत्ती, कोटरगेट, चांदतारा मस्जिद, दर्गारोड आणि वंजारपट्टी नाका येथे भरत असतो. या ठिकाणी ग्रामीण भागातील चिंबीपाडा, मीठपाडा, आनगाव, पाये आदी ठिकाणांहून आदिवासी गवत, पेंढा आणि झाडांचा पाला आणून येथे विकतात.