बाळासाहेब, दिघेसाहेब 'हा' सोहळा पाहत आहेत-एकनाथ शिंदे; ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवून केला श्रीरामाचा जयघोष

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कौपिनेश्वर या मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन सोमवारी सकाळी करण्यात आले
बाळासाहेब, दिघेसाहेब 'हा' सोहळा पाहत आहेत-एकनाथ शिंदे; ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजवून केला श्रीरामाचा जयघोष

ठाणे : अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह ‘जय श्रीराम’ चा जयघोष केला. स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर ठाण्याची ग्रामदेवता असलेल्या कौपिनेश्वर मंदिरामधील प्रभू श्रीरामाचा मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी महाआरती केली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हा’ ऐतिहासिक सोहळा कोणी पाहत असेल किंवा नसेल. पण, हा सोहळा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोघे नक्की पाहत असतील. असे सांगत नाव न घेता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला मारला आहे. महाराष्ट्र आणि अयोध्याचे एक आगळेवेगळे जिव्हाळ्याचे नाते आहे. तसेच सर्वांचे स्वप्न साकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा महासोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील कौपिनेश्वर या मंदिरात शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन सोमवारी सकाळी करण्यात आले होते. गुढी पाडव्याच्या दिवशी कौपीनेश्वर मंदीर येथून मिरवणुक काढण्यात येते. त्यादिवशी मंदीरात जसे वातावरण असते, तसेच काहीसे वातावरण सोमवारी महाआरतीच्या निमित्ताने दिसून आले. मंदिरात सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आलेली होती. रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा महासोहळा रामभक्तांना पहाता यावा, यासाठी मोठा पडदा लावण्यात आला होता. त्यावर अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण करण्यात येत होते. सोमवार सकाळपासूनच कौपीनेश्वर मंदिरात रामभक्त पारंपरिक वेशभुषेत जमण्यास सुरुवात झाली. खांद्यावर श्रीरामाचे मफलर घेऊन भक्तांकडून रामाचा जयघोष सुरू होता. यावेळी शेकडो रामभक्तांसह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त अभिजीत बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाआरती आणि १११ फुटी अगरबत्ती

ठाण्याच्या कौपीनेश्वर मंदिराच्या आवारात महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १११ फूट नैसर्गिक सुगंधी अगरबत्ती प्रज्वलित केली. प्रसिद्ध सायकल अगरबत्ती कंपनीने २३ दिवस सुगंध दरवळत ठेवणारी १११ फुटांची अगरबत्ती तयार केली आहे. चारकोल, जिगट, बांबू, चंदन पावडर, क्राफ्ट ट्यूब आणि काळजीपूर्वक निवडलेले दशंगामध्ये मध, कोनेरी गेड्डे, तूप,चंदनाचे लाकूड पावडर, गुग्गुला, आगरू, सांब्राणी, देवदारू, लोबन आणि पांढरी मोहरी सोबत कोळसा, जिगट आणि गूळ,परमपारा नावाचा सुगंध अशा नैसर्गिक साहित्यांनी अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती १८ कारागिरांनी २३ दिवसात तयार केली. ही अगरबत्ती २३ दिवस ५०० मीटरपर्यंत सुगंध पसरविणारी आहे. ही अगरबत्ती मैसूर येथे तयार करून ती मंदिराच्या आवारात आणण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in