

बदलापूर : सातासमुद्रापार राहूनही आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या स्पेनमधील महाराष्ट्रीय बांधवांनी एकत्र येत बार्सिलोना शहरात यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला. महाराष्ट्र मंडळ स्पेनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय गणेशोत्सवाचे हे सलग चौथे वर्ष होते. परदेशातही मराठमोळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्याने भारतीय समुदायामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
या सोहळ्याला बार्सिलोना येथील भारताचे महावाणिज्यदूत इंबसेकर सुंदरमूर्ती, कॉन्सुल सुदीप्त रॉय, त्यांच्या कार्यालयातील अधिकारी तसेच बार्सिलोनामध्ये वास्तव्यास असलेला मोठा भारतीय समुदाय उपस्थित होता. गणेशमूर्तीच्या स्थापनेनंतर उपस्थित गणेशभक्तांनी एकत्र येत श्री गणपती अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील कलाकारांनी आपल्या कलाविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली.
भारतीय समुदायातून कौतुक
परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, सण आणि परंपरा जपण्याचे कार्य महाराष्ट्र मंडळ स्पेनच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय समुदायाला एकत्र आणण्यासोबतच स्थानिक नागरिकांनाही भारतीय संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. मंडळाच्या या उपक्रमाचे भारतीय समुदायातून कौतुक होत आहे, अशी माहिती सुमित कुतवळ यांनी दिली.