बारवी ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपले

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. सोमवारी पहाटे धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले. गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने होणारी वाढ पाहता सर्वांचेच बारवी धरण ओव्हरफ्लो केव्हा होणार याकडे लक्ष लागले होते.
बारवी ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपले
बारवी ओव्हरफ्लो! ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपलेप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बदलापूर : संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. सोमवारी पहाटे धरण काठोकाठ भरून ओसंडून वाहू लागले. गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने होणारी वाढ पाहता सर्वांचेच बारवी धरण ओव्हरफ्लो केव्हा होणार याकडे लक्ष लागले होते. आता धरण १०० टक्के भरल्याने ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपले आहे.

एमआयडीसीच्या बारवी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.९) संध्याकाळी ५ वाजता धरणाची पाणीपातळी ७२.५९ मीटरवर पोहोचली होती. त्यावेळी धरणात ३३८.४४ दशलक्ष घनमीटर मुबलक उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता आणि धरण ९९.८८ टक्के भरले होते. धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर असल्याने, धरण काठोकाठ भरण्यासाठी केवळ ०.०१ मीटरची आवश्यकता होती. रविवारी रात्रीतून पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आणि धरणात येणाऱ्या संततधार प्रवाहामुळे, सोमवारी पहाटेच्या सुमारास धरणाने आपली सर्वोच्च पातळी ७२.६० मीटर ही पातळी गाठली. यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

यंदा जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला होता, त्यामुळे सर्वांचेच टेन्शन वाढले होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा ४८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर पावसाने पुन्हा मोठी विश्रांती घेतली, ज्यामुळे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात धरणाने ५० टक्क्यांपर्यंतचा टप्पा गाठला होता. याच काळात धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून पाणीगळती होत असल्याची गंभीर बाब समोर आली होती. मात्र, एमआयडीसी प्रशासनाने अत्यंत तत्परतेने आणि युद्धपातळीवर या तांत्रिक समस्येची दखल घेत दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि लाखो लिटर पाण्याची नासाडी रोखली. प्रशासनाच्या या सतर्कतेचा मोठा फायदा धरणाचा साठा सुरक्षित राहण्यात झाला.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मीरा-भाईंदर यांसारख्या प्रमुख शहरांसह एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. हे धरण पूर्ण भरल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बारवी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in