
बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागलेले बारवी धरण अखेर ओव्हर फ्लो झाले आहे. यंदा पावसाचा जोर पाहता जुलै अखेरीस धरण भरण्याची अपेक्षा होती. मात्र जुलै महिन्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत आठवडाभर उशिराने बारवी धरण भरले आहे. मात्र आता हे धरण पूर्णपणे भरून वाहू लागल्याने ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे.
शनिवारी (दि. १६) दुपारी ३.२५ वा. बारवी धरण पूर्णपणे भरून वाहू लागले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
मागील वर्षी ९ ऑगस्टला म्हणजे आठवडाभर आधीच बारवी धरण पूर्णपणे भरून वाहू लागले होते. यंदाच्या मे महिन्यात सुरुवातीला बारवी धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आणि त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी आणि पूर्व मोसमी पावसामुळेही धरणातील पाणीसाठा वाढला होता. जून आणि जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे २५ जून रोजीच बारवी धरण निम्मे भरून धरणात ५०.९५ टक्के पाणीसाठा झाला होता. ५ जुलैपर्यंत हा पाणीसाठा वाढून ६०.६८ टक्क्यांवर पोहचला होता.
धरण भरण्याचा हा वेग पाहता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी बारवी धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रशासनाला वाटत होती. त्यानुसार त्यांनी धरण आणि बारवी नदी काठच्या नागरिकांना, स्थानिक प्रशासनाला तसा खबरदारीचा इशाराही दिला होता. मात्र नंतर पावसाचा जोर मंदावला आणि पावसाने उसंतही घेतली. त्यामुळे धरण भरण्याचा वेग मंदावला होता.
बारवी धरणातून अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर महापालिका, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ठाणे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शासकीय यंत्रणांसह जिल्ह्याचे डोळे बारवी धरण भरण्याकडे लागलेले होते. आता हे धरण पूर्णपणे भरल्याने ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे.
अवघ्या आठवड्याभरात ३३ टक्के पाणीसाठी वाढला
यंदाच्या ९ ऑगस्टला बारवी धरणात ७२.२४ टक्के पाणीसाठा होता. १० ऑगस्टला त्यामध्ये अवघ्या ४ टक्क्यांची वाढ झाली. त्यांनंतर पावसाने अधूनमधून दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने १३ ऑगस्टपर्यंत धरणात ७२.४५ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने १६ ऑगस्टला सकाळी ८ वा. धरणातील पाणी साठ्यात १० टक्क्यांची वाढ होऊन तो ७२.५५ टक्क्यांवर पोहचला. दुपारी १२ वाजेपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ होऊन तो ७२.५९ टक्क्यांवर पोहचला आणि दुपारी ३.२५ वा. बारवी धरण पूर्णपणे भरून वाहू लागले.