कासारवडवली येथील तलावाचे होणार सुशोभीकरण; उपवनप्रमाणे 'म्युझिकल फाऊंटन'

ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, या तलावांचे सुशोभीकरण करून, जतन करून सांस्कृतिक वारसा जपणे गरजेचे आहे.
कासारवडवली येथील तलावाचे होणार सुशोभीकरण; उपवनप्रमाणे 'म्युझिकल फाऊंटन'

ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, या तलावांचे सुशोभीकरण करून, जतन करून सांस्कृतिक वारसा जपणे गरजेचे आहे. त्याच दृष्टीने घोडबंदर परिसरातील कासारवडवली राममंदिर येथील तलावावर काळे दगड वापरून घाटाचे बांधकाम करण्यात येणार असून त्या ठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाऊंटन) बसवून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते पार पडला.

त्यासाठी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कासारवडवली राममंदिर येथे असलेल्या तलावाजवळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मॉर्निंगवॉकसाठी, फिरण्यासाठी, निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ-संध्याकाळी येत असतात. या तलावाचे जतन करण्याच्या दृष्टीने उपवन घाटाप्रमाणे या तलावाच्या किनाऱ्याला काळे दगड वापरून घाटांचे बांधकाम करून त्या ठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाऊंटन) बसवून लाइटच्या आधारे लेझर शो करून या तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निधी मंजूर करून आणला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याने राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्याच संकल्पनेतून ठाण्यातील उपवन तलावाजवळ बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाट बनविण्यात आला असून तेथे अनेक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरात होतात. या तलावाचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाऊंटन) बसविण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या कामासाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा निधी आमदार सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला होता.

या तलावामधील शक्य होईल तितका गाळ काढला जाईल आणि तलाव स्वच्छ केले जाईल. तलावातच विसर्जन व इतर धार्मिक विधी होत असल्याने तलावाची योग्य ती स्वच्छता वर्षभर राहत नाही. त्यामुळे या तलावाच्या जवळ धार्मिक विधी व विसर्जन करण्यासाठी छोटा २० बाय ४० फुटांचा वेगळा पॉन्ड तयार केला जाईल. तिकडे पायऱ्या बनवल्या जातील. म्हणजे त्या वेगळ्या पॉन्डमध्येच विसर्जन आणि सर्व धार्मिक कार्यक्रम नागरिक करू शकतील व मुख्य तलाव हा सुरक्षित, स्वच्छ राहील, मुख्य तलावात कोणी उतरणार नाही. तलावाच्या परिसरात निसर्ग रम्य वातावरण तयार केले जाईल. तलावाच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत चांगले गार्डन तयार केले जाईल. या तलावाचे सुशोभीकरण केले जात असताना संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून संरक्षक रेलिंग लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, नागरिक याना बसण्यासाठी गजेंबौ, जॉगिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात येणार आहे.

"या तलावाच्या मधोमध म्युझिकल फाऊंटन लावले जातील. हे संगीत कारंजे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह शहरातील लोकही ते पाहण्यासाठी येतील. काम पूर्ण झाल्यानंतर म्युझिकल फाऊंटन व्यवस्थित सुरळीत सुरू राहावा, यासाठी पुढील ५ वर्षे त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही त्याच ठेकेदाराला देण्यात येईल. या तलावाचे जेव्हा सुशोभीकरण होईल तेव्हा माझ्या मतदारसंघातील हे तलाव सगळ्यांसाठी नक्कीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल. म्युझिकल फाऊंटन सर्वांच्या पसंतीस उतरेल. या कामांमुळे परिसराच्या व शहराच्या सौंदर्यात भर पडेल. 'म्युझिकल फाऊंटन' फार कमी ठिकाणी आहेत. कासारवडवली राममंदिर येथिल तलावाचे सुशोभीकरण आणि म्युझिकल फाऊंटनचे काम लवकरच सुरू होणार असल्यामुळे ठाणे शहरातील नागरिकांसाठी हे सगळ्यात मोठे आकर्षणाचे केंद्र ठरेल."- प्रताप सरनाईक, आमदार

logo
marathi.freepressjournal.in