
कल्याण : अनोळखी क्रमांकावरून वीजबिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फसव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणचे संकेतस्थळ तसेच मोबाइल ॲपवर बनावट मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल, याची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
'तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा' असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. एखाद्या ग्राहकाने संपर्क साधला तर वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टीमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाहीत.
ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.
सतर्क राहा; फसवणूक टाळा
महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही
महावितरण कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एसएमएस व व्हॉट्सॲप मेसेज, इ-मेल पाठविण्यात येत नाहीत.
बिलाच्या पेमेंटसाठी लिक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये.
मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.
ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका.