पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना संधी; ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्याने उमेदवारी

पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना संधी; ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्याने उमेदवारी

पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेकडून भारती कामडी यांचा अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदाची माळ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून निलेश सांबरे यांच्या गळ्यात पडली होती.त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाली.

संतोष पाटील/वाडा

पालघर लोकसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना शिवसेना (उबाठा) उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांचेच नाव चर्चेत व आघाडीवरही होते. भारती कामडी या ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्या व त्याचेच फळ आता त्यांना उमेदवारीतून मिळाले आहे.

कामडी यांनी आधीपासून पालघर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वंच कार्यकर्त्यांचा ओढा होता. भारती कामडी या मात्र ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्या होत्या.

पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेकडून भारती कामडी यांचा अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदाची माळ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून निलेश सांबरे यांच्या गळ्यात पडली होती.त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाली.

पालघर जिल्हा परिषदेच्या त्या दीड वर्षे अध्यक्ष होत्या. त्या सुरुवातीला वाडा तालुक्यातील मांडा जिल्हा परिषद गटातून प्रथम निवडून आल्या होत्या. मात्र वाडा तालुक्यात त्यांना पुन्हा तिकीट न मिळाल्याने त्यांना पक्षाने दुसऱ्या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटविला आहे. सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या कामडी यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. पालघर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे होता.

विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका

वाढवण बंदराच्या प्रश्नावर त्यांनी ठामपणे भूमिका घेऊन मच्छीमार, स्थानिक शेतकरी आणि अन्य नागरिकांच्या बरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पालघर जिल्ह्याला स्थापन होऊन दहा वर्षे झाली असली तरी अजूनही तो विकासात मागे आहे. तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर, पेसा भरती अशा विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in