भाईंदर उड्डाणपुलाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज; कथित अतिविद्वानांच्या बोलघेवडेपणामुळे दिशाभूल आणि गोंधळ

मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्गिकेखालील उड्डाणपुलाच्या काही तांत्रिक बाबींबाबत समाज माध्यमांवर दिशाभूल आणि गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुलाचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होणार असताना काही लोकांनी अर्धवट माहिती पसरवून भ्रामक चर्चांना चालना दिली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे.
भाईंदर उड्डाणपुलाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज; कथित अतिविद्वानांच्या बोलघेवडेपणामुळे दिशाभूल आणि गोंधळ
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरातील मेट्रो मार्गिकेखालील उड्डाणपुलाच्या काही तांत्रिक बाबींबाबत समाज माध्यमांवर दिशाभूल आणि गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुलाचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होणार असताना काही लोकांनी अर्धवट माहिती पसरवून भ्रामक चर्चांना चालना दिली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे.

मीरारोडच्या पेट्रोलपंपपासून आझादनगर-फाटक मार्गावरून उतरणाऱ्या मेट्रो मार्गिकेखालील उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या आकाराबाबत इंजिनियरपेक्षा स्वतःला अतिविद्वान समजणाऱ्या काही व्यक्तींनी समाज माध्यमांवर अर्धवट माहिती पसरवली. त्यातून नागरिकांची दिशाभूल होत असून, काही राजकारणीही प्रसिद्धीसाठी या चर्चेत सामील झाले आहेत. मेट्रो मार्गिकेचे काम शहरात सुरू असून मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधले गेले आहेत. श्रीकांत जिचकार चौक आणि सिल्वर पार्क जंक्शनवरील दोन पूल वाहतुकीसाठी आधीच खुले आहेत.

जुना पेट्रोलपंप ते गोल्डन नेस्ट जंक्शनपर्यंतचा उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी २-२ मार्गिकांचा असून, आझादनगर भागात तो दोन्ही बाजूंनी १-१ मार्गिकांचा आहे. यामागचे कारण हे आहे की, आझादनगरचा रस्ता ३० मीटर असून मुख्य रस्ता ४५ मीटर आहे. त्यामुळे या भागासाठी १-१ मार्गिकेचा पूल बनवला गेला. भविष्यात भाईंदर पश्चिमेकडे पूल नेण्याचे नियोजन असल्याने सध्याच्या १-१ मार्गिकांचा पूल त्याच दिशेला जोडला जाणार आहे.गोल्डन नेस्ट जंक्शनवर ५ रस्ते एकत्र येतात, त्यामुळे हे जंक्शन वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहे. मेट्रो मार्गिका आणि स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे ४-पदरी पूल बांधणे शक्य होणार नाही. भाईंदर पूर्वेकडून पश्चिमेकडे उड्डाणपूल नेण्याच्या कामासाठी सध्याचे १-१ मार्गिकेचे पूल जोडले जाणार आहे. तसेच सुरक्षा कारणास्तव भाईंदर फाटककडे जाताना २-पदरी मार्गिकेवर १-पदरी मार्गिका उतरवली आहे, अशी माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली.

एखाद्या रस्त्याचा किंवा पूलचा ४-पदरी वा २-पदरी भाग हा शेवटपर्यंत समान राहतोच असे नसते. रस्त्याची रुंदी कमी-जास्त होणे ही सामान्य बाब आहे, आणि यामुळे अपघात होण्याची गरज नाही. भाईंदर जुने फाटक बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी लोकांना भुयारी मार्ग किंवा लहान उड्डाणपूल आवश्यक होते. मात्र, काही अर्धवट ज्ञान पसरवणाऱ्या व्यक्तींमुळे गैरसमज निर्माण झाला आहे.

एमएमआरडीए अधिकारी

logo
marathi.freepressjournal.in