अखेर भाईंदर ते वसई रो-रो सेवेला सुरुवात; खासदार विचारे यांच्या पाठपुराव्यानंतर २० फेब्रुवारीचा मुहूर्त

रो-रो जलवाहतूक सेवेमध्ये भाईंदर व वसई या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर सुमारे ३४ किलोमीटरने कमी होणार आहे.
अखेर भाईंदर ते वसई रो-रो सेवेला सुरुवात;  खासदार विचारे यांच्या पाठपुराव्यानंतर २० फेब्रुवारीचा मुहूर्त

भाईंंदर : भाईंदर ते वसई रो-रो जलवाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी अनेक वर्षांपासून केंद्र शासनाकडे केली होती. त्यानुसार सागरमाला योजनेंतर्गत २०१६ साली मंजुरी दिली आणि त्यानंतर पर्यावरण परवानगीसाठी वेळ लागत होता, तेव्हा खासदार विचारे यांनी संसदेत मुद्दा उपस्थित करत आणि त्याचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार भाईंदर ते वसईदरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे केली होती. त्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रो-रो सेवेचा मुहूर्त मिळाला असून अखेर या रो-रो जलवाहतूक सेवा येत्या मंगळवारी २० फेब्रुवारीपासून रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वसई खाडीमध्ये भाईंदर ते वसई दरम्यान सध्या ‘प्रायोगिक तत्त्वावर’ रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. या फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढउतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर, या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरीत्या करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. मेसर्स सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली असून, एकाच फेरीत १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची फेरीबोटीची क्षमता आहे. कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या सेवेसाठी सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.

जनतेसाठी ही सेवा दिलासादायक

रो-रो जलवाहतूक सेवेमध्ये भाईंदर व वसई या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर सुमारे ३४ किलोमीटरने कमी होणार आहे. सध्या ही फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असली तरी, वाहतूककोंडीचा सामना करत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल, असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले आहे, तर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांचे स्थानिकांनी अभिनंदन करत रो-रो जलवाहतूक सेवेचे अभिनंदन केले आहे.

डोंगरी चौक ते वसई रो-रो सेवेची मागणी

भाईंदर उत्तन किनार पट्टीवरील मच्छीमारांना वसई येथे जाण्यासाठी लांब पल्ल्याचा मार्गाचा अवलंब करावा लागत असतो. त्यासाठी त्यांचा वेळ व पैसा दोन्ही खर्चिक पडत असते. ठाणे जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय सुद्धा पालघरला असल्याने बोटीचे लायसन्स व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार त्यांना वसई, पालघरला जावे लागते. यासाठी खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे डोंगरी चौक ते समोर दिसणारी वसई जेट्टीवर रो-रो सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थानिक मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनीही उत्तन वसई जलवाहतूक सेवा जोडण्याची मागणी केली आहे.

प्रवासी तिकीट दर

मोटारसायकल (चालकासह) ६० रु.

रिकामी तीनचाकी रिक्षा मिनीडोर (चालकासह) १०० रु.

चारचाकी वाहन (कार), (चालकासह) १८० रु.

मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग) ४० रु.

प्रवासी प्रौढ (१२ वर्षांवरील) ३० रु.

प्रवासी लहान (३ ते १२ वर्षांपर्यंत) १५ रु.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in