
भिवंडी : शहरातील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्षीय चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे. आहिद एजाज अन्सारी (५) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. १६ डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहिद हरवला होता. दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह बुधवारी सायंकाळी एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला.
आहिदचे वडील एजाज अन्सारी हे पावरलूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात. १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी आहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवले, मात्र तो सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी व स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला. शेवटी शांती नगर पोलीस ठाण्यात आहिद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावरही मुलाच्या हरवल्याची माहिती पसरवण्यात आली होती. मात्र बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.