
भिवंडी : सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्याच्या गुन्ह्यात अटक झालेला व नंतर न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला सलामत अन्सारी (३४) या विकृत आरोपीने पुन्हा एकदा तसाच घृणास्पद प्रकार घडवून सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट होऊन अवघ्या पाच तासांत आरोपीला भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतून पकडले. त्यानंतर त्याचा ताबा निजामपूर पोलिसांकडे सोपवण्यात आला असून न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सात वर्षीय चिमुरडी शौचासाठी बाहेर गेल्यानंतर बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. नजीकच्या चाळीतील बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर प्लास्टिकच्या गोणीत तिचा मृतदेह सापडला.
पाच पोलीस निलंबित
दरम्यान, या आरोपीला यापूर्वी १३ सप्टेंबर २०२३ रोजीही अशाच पद्धतीने सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र, ४ ऑगस्ट २०२५ रोजी भिवंडी न्यायालयात हजेरीसाठी आणल्यावर तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. या प्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.