भिवंडी : बंद शाळेचे होणार पुनर्वसन; ६० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर

कल्याण रोड आजबीबी येथील मनपा शिक्षण मंडळाच्या शाळा क्र.६५ ची इमारत जुनी व मोडकळीस आली असताना ती वेळीच दुरुस्त न करता पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
भिवंडी : बंद शाळेचे होणार पुनर्वसन; ६० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर

भिवंडी : शहरातील कल्याण रोड आजबीबी येथील मनपा शिक्षण मंडळाच्या शाळा क्र.६५ ची इमारत जुनी व मोडकळीस आली असताना ती वेळीच दुरुस्त न करता पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. या परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भिवंडी पश्चिमचे आमदार रईस शेख यांनी पुढाकार घेतल्याने परिसरातील पालकांनी त्याचे स्वागत केले आहे. या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच आ. रईस शेख यांच्या हस्ते झाले आहे. भिवंडी मनपा शिक्षण मंडळाची शाळा क्र. ६५ ही उर्दू भाषिक शाळा ६१ वर्षे जुनी असून या शाळेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्चपदास पोहोचले आहेत, तर काही व्यावसायिक बनले आहेत.

मात्र गेल्या काही वर्षांपासून या शाळेचे वर्ग मोडकळीस आले असून त्याबाबत अनेकवेळा शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी व मनपा प्रशासनास लेखी कळविले होते. परंतु पालिका प्रशासनाने निधी उपलब्ध नसल्याचा बहाणा करून त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब आमदार रईस शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाळेची इमारत नव्याने बांधण्यासाठी ६० लाख रुपये आमदार निधी मंजूर करून नियोजित इमारतीचे भूमिपूजन केले. त्याचबरोबर या नवीन इमारतीमध्ये वाचनालय बनवून शाळेत अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे की, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीस लागेल, अशी माहिती आ. रईस शेख यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in