ठाणे : शहरातील सीपी तलाव परिसरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने भिवंडी येथील जागेचा पर्याय शोधून काढण्यात आला आहे. मात्र दिवा आणि डायघरच्या तुलनेत भिवंडीच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी ठाण्यापासून तब्बल ६० किमीचे अंतर कापावे लागणार आहे. यामुळे ठाणे महापालिकेचा प्रवास खर्च तसेच इंधन खर्च देखील वाढणार असून पर्यायाने या कचरा प्रकल्पाच्या यशस्वीतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भिवंडीतील कचऱ्याचा खर्च पालिकेच्या माथी बसणार आहे.
ठाणे शहरात रोज एक हजार टन कचरा संकलीत होतो. काही वर्षांपूर्वी ८०० टन कचरा संकलीत होत होता. पण वाढत्या नागरिकरणामुळे कचराही वाढला आहे. एकीकडे कचरा वाढत असताना त्याची विल्हेवाट व प्रक्रिया करणारी कोणतीच ठोस उपाययोजना ठाणे महापालिकेकडे नाही. दोन वर्षांपूर्वी राजकीय खेळीतून ठाणे महापालिकेने दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करून भंडार्ली येथे तात्पुरता प्रकल्प उभारला. आता हा प्रकल्पही बंद झाला आहे. दरम्यान डायघर येथे कचरा विल्हेवाट व प्रक्रिया प्रकल्प सुरू केला आहे. पण अजूनही तो पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. वास्तविक शहरातून संकलित होणारा कचरा सीपी टँक येथे जमा करून पुढे तो दिवा डम्पिंगला पाठवण्यात येत होता. नंतर हा प्रवास कल्याणच्या भंडार्लीच्या दिशेने सुरू झाला. पण आता हे दोन्ही पर्याय बंद झाल्याने सीपी टँक या भरनागरी वस्तीत कचऱ्याचे इमले उभे राहण्यास सुरुवात झाली आहे.
या कचराकोंडीला उतारा म्हणून ठाणे महापालिकेने भिवंडीतील पडघा येथे कचरा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे. प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाकडे जागेची मागणी केल्यानंतर भिंवडी येथील आतकोली भागातील भूखंड ताब्यात आला आहे. सुमारे ३५ हजार हेक्टर इतका हा भूखंड असून येथे डायघरच्या धर्तीवर कचरा विल्हेवाट व प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र डायघरच्या तुलनेत पडघा प्रकल्पाची क्षमता कमी आहे. वास्तविक ठाण्यातील वाढत्या कचऱ्याच्या आव्हानासमोर डायघर कचरा प्रकल्पही अपुरा पडत आहे. येथे प्रतिदिन ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे उर्वरित कचरा प्रक्रियेसाठी भिवंडी प्रकल्पाची मदत मिळणार आहे. येथे सुमारे ४०० टन कचऱ्याची विल्हेवाट करणे शक्य होणार आहे. काही महिन्यातच हा प्रकल्प सुरू होईल. त्यामुळे सीपी टँकभोवती उभे राहिलेले कचऱ्याच्या साम्राज्यातून मुक्ता मिळेल, असा दावाही करण्यात आला आहे.
पूर्वी दिवा डम्पिंग सुरू असताना ठाणे ते दिवा असा कचऱ्याचा प्रवास सुमारे १९ ते २० किमी होता. डायघर प्रकल्पाकडे जाणाऱ्या कचराही साधारण इतकेच अंतर कापते. पण भिंडीत कचरा वाहून नेण्यासाठी सुमारे ६० किमीचे अंतर गाठावे लागणार आहे. म्हणजे हा प्रवास ४० किमीने वाढणार आहे. त्यामुळे अधिकचे इंधन खर्च करण्याची तयारी ठेकेदारांना करावी लागणार आहे. पर्यायाने नवीन प्रक्रियेत ठेकेदारांना या वाढीव इंधन खर्चही ठाणे पालिकेला अदा करावा लागणार असल्याने प्रकल्प उभारणीपेक्षा प्रवास खर्चाचा भार वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे कचऱ्याच्या प्रत्येक डम्परची फेरी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प किती यशस्वी होईल याविषयी शंका व्यक्त होत आहे.
प्रभागस्तरीय प्रकल्पही बारगळले...
कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीनिहाय प्रकल्प उभारण्याची योजना आणली होती. त्यानुसार पहिल्यांदा कोपरीत त्यानंतर मानपाडा येथे हिरानंदानी परिसरात प्रकल्प उभारण्यातही आला. पण दुर्गंधी व घाणीमुळे त्याला विरोध होऊन हा प्रकल्प बंद झाला. आपल्या प्रभागात कचरा नको अशीच मानसिकता लोकप्रतिनिधी व नागरिकांची आहे. वास्तविक नौपाडा व उथळसर हे दोन दाटीवाटीचे प्रभाग वगळल्यास सर्वच प्रभागांमध्ये किमान ५ टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणे शक्य आहे. पण उदासिनतेमुळे ही योजना बारगळल्याचा फटका बसत असल्याचेही बोलले जात आहे.